स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या केंद्रीय सरकारी अधिकाऱ्यांना यापुढे सरकारच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. कारण, यापुढे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय सचिवांच्या बैठकीत याबद्दलची माहिती दिली. दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला अनेक अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येते. मात्र, यापैकी अनेकजण कार्यक्रमाला गैरहजर राहत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये निदर्शनास आले आहे. अशाप्रकारच्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यक्रमाला अनुपस्थित राहणे, ही क्षुल्लक बाब नाही. यावेळी पंतप्रधान संपूर्ण देशाला संबोधित करतात. अशावेळी त्याठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे असते, ही गोष्ट गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी ध्यानात घेतली पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य असल्याची जाणीव या अधिकाऱ्यांना करून देणे गरजेचे असल्याचे प्रदीप कुमार यांनी केंद्रीय सचिवांच्या बैठकीत सांगितले. याशिवाय, सिन्हा यांनी सर्व केंद्रीय सचिवांनी त्यांच्या अधिकारकक्षेत येणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे आदेश द्यावेत, असेही बैठकीदरम्यान सांगितले. कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश सिन्हा यांनी केंद्रीय सचिवांना दिले आहेत. केंद्र सरकारच्या अनेक खात्यांमधील अधिकाऱ्यांना यापूर्वीच यासंदर्भातील आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.