पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केदारनाथ मंदिरात हजेरी लावली. केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येतो आहे. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी लोकांना संबोधित केले. ‘केदारनाथमध्ये २०१३ मध्ये प्रलय आला होता. त्यावेळी मी देशाचा पंतप्रधान नव्हतो, गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारला केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत एक प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला त्यावेळी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवली होती. मात्र त्या प्रस्तावामुळे काँग्रेस पक्ष धास्तावला होता त्यांनी तातडीने उत्तराखंड सरकारवर दबाव आणला म्हणूनच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी माझा प्रस्ताव नाकारला’, असा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथमध्ये केला. काँग्रेसने या मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेच त्यांनी आपल्या आरोपातून स्पष्ट केले आहे.

प्रलयानंतर केदारनाथ मंदिराची अवस्था पाहून मला वाईट वाटले, त्याचमुळे या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे याची जाणीव मला झाली. त्याच अनुषंगाने त्यावेळचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना मी भेटलो मात्र काँग्रेसने माझा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी माझा प्रस्ताव नामंजूर केला, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारानाथ मंदिरात अभिषेक केला आणि पूजाही केली. ‘जय जय केदार’ अशी घोषणा देत त्यांनी भाषण सुरू केले. मला १२५ कोटी जनतेची सेवा करायची आहे. केदारनाथाचे दर्शन घेतले आहे, आता मी २०२२ पर्यंत ‘न्यू इंडिया’च्या निर्मितीच्या दृष्टीने पावले टाकेन याची खात्री आहे, असेही मोदी यांनी म्हटले. भाजपचे सरकार आल्यावर केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घ्यावे लागणार आहे याची मला खात्री होती. तसा संकल्पच मी केला होता असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टाचार मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची भेटही घेतली.