जम्मू-काश्मीर निवडणुकांच्या ताज्या निकालानंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ( पीडीपी) विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी पीडीपी सत्तापटाच्या जवळ आला असला तरी, प्रत्यक्षात सत्ताग्रहण करताना मुफ्ती मोहम्मद सईद यांना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणाची निवड करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

पीडीपीसमोर असलेले पर्याय
जम्मू-काश्मीरमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, पक्षाचे नेते नईम अख्तर यांनी प्रचारादरम्यान पीडीपीला निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत न देणारा विजय चिंताजनक ठरू शकतो, असे विधान केले होते. अख्तर यांच्या याच विधानाची प्रचिती पुढील काही दिवसांत येणार आहे.
पीडीपीसमोर सर्वात पहिला पर्याय असेल तो भाजप आणि काँग्रेस यांच्यातील एकाची निवड करण्याचा. याशिवाय, नॅशनल कॉन्फरन्स आणि सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स यांच्याशी युती करण्याचाही पर्याय पीडीपीसमोर असले. यंदा सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, जमेल तितक्या जागांवर विजय मिळवून भाजपच्या साथीने सत्तेत राहण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. अशाप्रकारची परिस्थिती ओढविल्यास सत्तेतून बाहेर राहण्याचा धोका टाळण्यासाठी पीडीपीला प्रयत्न करावे लागणार आहेत.

पीडीपीने कोणाची निवड करावी?
काँग्रेसच्या साथीने विधानसभेत सत्ता स्थापन करण्याचा पर्याय पीडीपीसाठी सर्वात चांगला ठरू शकतो. काँग्रेसशी युती केल्यास पीडीपीचा काश्मीर खोऱ्यातील आणि जम्मूमधील मुस्लिम मतदार दुरावण्याचा धोका कमी आहे. यामुळे राज्यातील मुस्लिम मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा आणि नॅशनल कॉन्फरन्सची जागा घेऊ शकणारा पक्ष म्हणून पीडीपीची प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल.