आपल्याला सुरक्षा कोणत्या अधिकृत आदेशानुसार दिली आहे व आणखी कुठल्या सेवांसाठी आपण पात्र आहोत, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी माहिती अधिकारात अर्जाद्वारे विचारला होता व ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही ही माहिती देऊ शकत नाही असे मेहसाणा पोलिसांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. जसोदाबेन यांना असे सांगण्यात आले की, त्यांनी जी माहिती मागितली आहे ती स्थानिक गुप्तचर खात्याच्या (एलआयबी) अंतर्गत येते व राज्यात या खात्याचा समावेश माहिती अधिकारात केलेला नाही, सबब आम्ही ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. पोलीस उपअधीक्षक व जन माहिती अधिकारी भक्ती ठाकूर यांनी म्हटले आहे की, जसोदाबेन यांनी जी माहिती मागवली आहे ती अधिसूचना  स्थानिक गुप्तचर विभागाशी संबंधित आहे. एलआयबीला माहिती अधिकार कायद्यातून वगळलेले आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीमुळे माहिती आम्ही देऊ शकत नाही. जसोदाबेन यांना २३ डिसेंबरला हे उत्तर मिळाले आहे. जसोदाबेन या चिमणलाल मोदी यांच्या कन्या आहेत.