सरसंघचालक भागवतांचे विधान

अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी कोणाचाच विरोध नसल्याची महत्वपूर्ण टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी राजधानीमध्ये केली. हिंदू मुस्लिमांचे कलह धार्मिक कारणांमुळे नव्हे, तर राजकारणामुळे होत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पाष्टद्धभूमीवर सरसंघचालकांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.

विदर्भातील संत गुलाबमहाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाचा समारोप भागवतांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राममंदिराच्या मुद्दय़ावर स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. पण बोलता बोलता राममंदिराच्या निर्माणाबाबतचा संघाचा आग्रह लपवून ठेवला नाही.

सरसंघचालकांच्या भाषणापूर्वी विहिंपचे नेते आचार्य धर्मेंद्र आणि रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष रामविलास वेदांती यांनी राममंदिराचा मुद्दा  मांडला होता. मंदिरनिर्माणासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसल्याचे धर्मेंद्र यांनी ठासून सांगितले होते. भागवतांनी त्या दोघांच्या विधानांचा थेट उल्लेख केला नाही. पण संमेलनाच्या ठरावामधील राममंदिराबाबतच्या उल्लेखाचा संदर्भ दिला. ‘अयोध्येत विश्व्धर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे,’ असे ठरावात नमूद केले होते. हा एक मुद्दा सोडून अन्य ठराव मंजूर असल्याचे जाहीर करून ते म्हणाले, खरे तर अयोध्येचा मुद्दा या संमेलनात येण्याचे काही औचित्य नाही. तरीही तो आला आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्यास कोणाचा विरोध नाही. संत गुलाबमहाराज म्हणायचे, की हिंदू— मुस्लिमांमध्ये धार्मिक मुद्दय़ांवरून नव्हे, तर राजकारणावरून कलह होतात. हे घाणेरडे राजकारण एकदा दूर झाले की बस्स.

पुण्यातील ‘एमआयटी’चे विश्व्नाथ कराड आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या पुढाकाराने हे संमेलन विज्ञान भवनात दोन दिवस चालले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी उद्घघाटन केले होते, तर समारोपाला भागवत उपस्थित होते. व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.