फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी महिलांविषयी बेताल विधान करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. सैनिक तीन महिलांवर बलात्कार करु शकतात असे वादग्रस्त विधान रॉड्रिगो यांनी केले असून त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. ड्युटर्ट यांनी अप्रत्यक्षपणे सैनिकांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले अशी खंत महिला संघटनांनी व्यक्त केली आहे.

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी शुक्रवारी सैन्यातील जवानांशी संवाद साधला. दक्षिण फिलिपाइन्समधील मारावी या शहराच्या दिशेने फिलिपाइन्स सैन्याने कूच केले. सैन्याच्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी जवानांशी संवाद साधला. पण भाषणादरम्यान ड्युटर्ट यांची जीभ घसरली. तुम्हाला मार्शल लॉचा वापर करण्याची मुभा आहे. तुम्ही या अधिकाराचा वापर करा. तुमच्यावर कारवाईची वेळ आली तर तुमच्याऐवजी मी शिक्षा भोगणार असे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही तीन महिलांवर बलात्कार केले तर त्याची जबाबदारी माझी असेल. मी तुमच्यासाठी तुरुंगातही जाईन’ असे ड्युटर्ट यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात मारावी या शहरात ड्युटर्ट यांनी ६० दिवसांसाठी मार्शल लॉ लागू केला आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात आयसिस समर्थक दहशतवादी संघटना सक्रीय आहे. या संघटनेच्या तळांवर फिलिपाइन्स सैन्याने हवाई हल्लेही सुरु केले आहे. मार्शल लॉच्या काळात तुम्हाला कोणत्याही घरात घुसून चौकशी करण्याचे अधिकार आहेत असे ड्युटर्ट यांनी सांगितले. ड्युटर्ट त्यांच्या विधानावर ठाम असून त्यांनी गंमतीने असे विधान केल्याचे सांगितले जाते.

ड्युटर्ट यांच्या विधानावरुन टीकाही सुरु झाली आहे. बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यावर गंमतीने विधान करणे दुर्दैवी आहे असे महिला संघटनांचे म्हटले आहे. ड्युटर्ट हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मी गुन्हेगारांना हेलिकॉप्टरमधून फेकून दिले असते असे विधान त्यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. यावरुनही त्यांच्यावर टीका झाली होती.