बीसीसीआयचे नवे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची ग्वाही; पुण्याच्या अजय शिर्केकडे सचिवपद
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या व्यावहारिक शिफारशींची अंमलबजावणी करण्यास आम्ही अजिबात टाळाटाळ करणार नाही, अशी ग्वाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनिर्वाचित अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली आणि भारतीय क्रिकेटमधील सुधारणा प्रक्रिया पुढे चालू ठेवत असल्याचा संकल्पच जणू केला.
जागतिक क्रीडा क्षेत्रातील श्रीमंत संघटना म्हणून लौकिक असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रविवारी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्याकडे सचिवपद सोपवण्यात आले.
आयसीसीच्या स्वतंत्र कार्याध्यक्षपदावर दावेदारी करण्यासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्याने हे पद रिक्त झाले होते. बीसीसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ४१ वर्षीय ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकूर म्हणाले, ‘‘जिथे आव्हान असते, तिथेच संधी असते. हे सारे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. आता कार्य करण्याची संधी मला दिसते आहे. लोढा समितीच्या शिफारशींपासून आम्ही दूर पळत नाही, तर त्यातील व्यावहारिक शिफारशींचे आम्ही समर्थन करतो. या समितीने शिफारशी करण्याआधीच आम्ही अनेक सुधारणा केलेल्या आहेत. देशातील हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्यामुळे आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे.’’
आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शनिवारी म्हटले होते की, भारतीय क्रिकेट मंडळाने लोढा समितीच्या ७५ टक्के शिफारशी अमलात आणल्या आहेत. मात्र अमलात न आणलेल्या काही शिफारशी या खेळासाठी हानिकारक आहेत. याबाबत ठाकूर यांनी मनोहर यांचे आभार मानले. लोढा समितीच्या शिफारशी संपूर्णत: अमलात आणणे कठीण आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला अतिशय अभिमान वाटतो आहे. देशातील हा सर्वात लोकप्रिय खेळ असल्याची जाणीव मला आहे. जिथे आव्हान असते तिथेच संधी असते. हे सारे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. क्रिकेट प्रशासनामधील माझ्या प्रवासाला १६ वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. हिमाचल प्रदेशसारख्या छोटय़ा राज्यातील व्यक्तीला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणे, हा मी माझा सन्मान समजतो. माझ्या सदैव पाठीशी असणारे बीसीसीआयचे सदस्य, पूर्व विभागातील संघटना यांचा मी आभारी आहे.
– अनुराग ठाकूर,
बीसीसीआयचे अध्यक्ष

प्रशिक्षकपदासाठी खुले आवाहन
भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी बीसीसीआयकडून जाहिरात देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि यासाठी अर्जदारांना १० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी दिली.
‘‘बीसीसीआयकडे आलेल्या अर्जाचा आम्ही गांभीर्याने विचार करू आणि सर्वोत्तम पर्यायाची निवड करू. पारदर्शकता यावी, म्हणून आम्ही खुले आवाहन केले आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे ११ जूनपासून सुरू होणाऱ्या छोटेखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतासोबत प्रशिक्षक नसणार आहे. मात्र जुलै महिन्यात भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात असून, याआधी प्रशिक्षक नेमण्यात येईल. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासोबत आचारीसुद्धा असणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

* अनुराग ठाकूर बीसीसीआयचे ३४वे अध्यक्ष.
* ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर मतदारसंघातील खासदार.
* प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ते बीसीसीआय अध्यक्ष असा प्रवास करणारे ठाकूर हे राजसिंग डुंगरपूर (१९९८-९९) यांच्यानंतरचे दुसरे प्रशासक.
* २०१३ ते २०१७ या कालखंडासाठी पूर्व विभागाकडून नियुक्त करण्यात आलेले ठाकूर तिसरे अध्यक्ष आहेत.

अनुराग ठाकूर यांच्या घोषणा
१. भारताचे मुख्य प्रशिक्षक नेमण्यासाठी बीसीसीआयकडून जाहिरात देण्यात येईल. या पदाकरिता १० जूनपर्यंत अर्ज करता येईल.
२. दुष्काळासारख्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी स्टेडियममध्ये पाणी संवर्धन प्रकल्प राबवण्यात येणार असून, पुढील एक वर्षांकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सौर प्रणाली, पर्जन्य जल संचयन आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी आदी माध्यमांतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
३. दृष्टिहीन आणि मूक-बधिर क्रिकेटपटूंना पुढील पाच वष्रे मदत व्हावी म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात येणार आहे.
४. लोढा समितीने सुचवलेल्या शिफारशींनुसार संतोष रांगणेकर यांची मुख्य वित्त अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी विद्यार्थिनी आणि विशेष व्यक्तींना किमान १० टक्के मोफत तिकिटे राखून ठेवण्यात येतील.
६. शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींसाठी विशेष बसवण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे.
७. प्रेक्षकांच्या सोयीकरिता भारतातील सर्व स्टेडियममधील खुच्र्याना क्रमांक देण्यात येणार आहेत.
८. क्रिकेटरसिकांना योग्य माहिती आणि आकडेवारी ज्ञात व्हावी यासाठी सर्व राज्य संघटनांना अधिकृत फेसबुक, ट्विटर अकाऊंट्स आणि वेबसाइट्स कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
९. तळागाळातील क्रिकेट अकादमींना मार्गदर्शक ठरेल असे मोबाइल प्रशिक्षण अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे.
१०. महिला क्रिकेटपटू बीसीसीआयशी करारबद्ध झाल्या असून, त्यांना देशांतर्गत लीग हवी की बिग बॅशमध्ये खेळायचे आहे, याविषयी त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.