मानधनाच्या वादामुळे भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतणाऱ्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध यापुढे क्रिकेट मालिका न खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. याचप्रमाणे दौऱ्यावरील उर्वरित सामने तडकाफडकी रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.
मानधनाच्या वादामुळे विंडीजचा संघ भारत दौऱ्यावरून माघारी परतल्यामुळे बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने बैठकीत गंभीर भूमिका घेतली आणि धोरण निश्चित केले.
वेस्ट इंडिजविरुद्ध यापुढे कोणतीही मालिका भारत खेळणार नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यासंदर्भातील निर्णय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बिनविरोधपणे घेण्यात आले, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
अत्यंत कमी अवधीत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याचा प्रस्ताव स्वीकारणाऱ्या श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या भूमिकेचे बीसीसीआयकडून कौतुक करण्यात आले. ही मालिका २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
पुढील वर्षी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार होता, त्याऐवजी ते आता भारतात येत आहे. त्यामुळे जुलै/ऑगस्ट २०१५मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे, असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील क्रिकेट मालिकेला विराम देण्याच्या निर्णयाचा कालावधी मात्र नमूद करण्यात आलेला नाही. ८ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका, तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळणार होता. मात्र फक्त चार एकदिवसीय सामने खेळूनच हा संघ अचानक मायदेशी परतला.
विंडीजचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार -बिस्वाल
भारत दौऱ्यातून माघार घेणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आयपीएलच्या येत्या हंगामात बंदी घालण्यात येणार अशी चर्चा होती. परंतु ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पध्रेत त्यांना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, अशी माहिती आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर रणजिब बिस्वाल यांनी दिली.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर आयपीएलचा हंगाम बहरणार आहे. त्यामुळे खेळाडूंना तयारीसाठी फक्त ११ दिवस मिळणार आहेत.
‘‘आयपीएलच्या सातव्या हंगामात १५ दिवस संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामने झाले होते. त्याबद्दल नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी फ्रेंचायझींकडून करण्यात आली. बीसीसीआयचा लेखापाल ही रक्कम निश्चित करेल,’’ असे बिस्वाल यांनी सांगितले.