भारताच्या श्रीलंका दौऱ्याला उद्या सुरुवात होत आहे. गॅलेच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. परदेश दौऱ्यावर असताना कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. आपली तब्येत बिघडू नये यासाठी आहारतज्ञांनी ठरवून दिलेलं सकस अन्न खावं लागतं. मात्र बीसीसीआयने पहिल्या कसोटी सामन्याआधीचा भारतीय संघाच्या जेवणाचा व्हिडीओ आपल्या फेसबूक पेजवर शेअर केलाय. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, उमेश यादव आणि इतर खेळाडू चक्क चिकन करीवर ताव मारताना दिसत आहेत.

श्रीलंकेत असलेला उन्हाळा हा खेळाडूंसाठी घातक ठरु शकतो. त्यामुळे शरीराला थंड ठेवणं गरजेचं असतं. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच दही-भात खात हार्दिक पांड्या श्रीलंकेतल्या उन्हाळ्याची जाणीव करुन देत आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीने कशाचीही तमा न बाळगता थेट भारतीय पद्धतीच्या चिकन करीवर ताव मारला. मात्र भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मनावर नियंत्रण ठेवत, डाळ-भात खाण्यावर आपला भर दिला.

समोर चिकनची मसालेदार डिश दिसल्यावर भल्या भल्यांना मोह आवरता येत नाही. मग आपले क्रिकेटपटू याला कसे अपवाद ठरतील. गोलंदाज उमेश यादवनेही समोर चिकन दिसताच, चिकन आणि नानवर ताव मारला. “आठवड्यातून एकदा चिकन खाल्ल तरी चालतं”, असं म्हणत उमेश यादव पुन्हा एकदा चिकनवर तुटून पडला. दुसरीकडे फिरकीपटू रविंद्र जाडेजाने मात्र श्रीलंकन पद्धतीच्या विशेष सुपला आपली पसंती दिली. अखेर भारतीय संघाचा मिस्टर डिपेंडेबल चेतेश्वर पुजाराने, सर्व गोष्टी खाऊन झाल्यावर नारळपाणी घेत, द्रव पदार्थ घेणंही गरजेतं असल्याचं सांगितलं आहे.

टीम इंडिया परदेश दौऱ्यावर नेमकं काय खाते?

सकाळी ८ वाजता नाश्ता – ( केवळ फळं आणि ज्यूस )

अननस, केळी, संत्री, अॅवेकॅडो, कॉर्न फ्लेक्स, व्हिट फ्लेक्स, चोको पॉप्स, पावडरीचं दूध, बदाम-अक्रोड, मध, ब्राऊन ब्रेड-जाम, उकडलेली अंडी, चहा-कॉफी-ग्रिन टी, सॅलड, नारळाचं पाणी

दुपारी १२ वाजता जेवण –

स्विट कॉर्न सूर, ब्रेड रोल, नान, विविध भाज्यांची सॅलड, दही-भात, चिकन कबाब, चिकन मंचुरियन, दाल नवरतन, भेंडीची भाजी, फळं, दही आणि नारळाचं पाणी

दुपारी २:३० वाजता चहापानाची वेळ –

तंदुरी चिकन सँडविच, मटण व्रॅप, फ्रुट केक, कुकीज, बिस्कीटं, चहा-कॉफी, ग्रिन टी

संध्याकाळी ५ वाजता –

भात, चिकन मखनी, डाळ, पनीर भुर्जी, नान आणि फळं