भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित क्रिकेट मालिका श्रीलंकेत खेळवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकार राजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही मालिका श्रीलंकेत आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर आला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या परवानगीसाठी पाठवण्यात आला आहे, मात्र केंद्र सरकार श्रीलंकेत मालिका आयोजनाला मंजुरी देण्याची शक्यता कमी आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने मर्यादा ओलांडली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेला बहुतांशी नागरिकांचा पाठिंबा नाही. दहशतवादी कारवायांना पाठिंबा असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणत्याही माध्यमातून संबंध जोडूू नयेत, असा प्रवाह आहे. अशा वेळी मालिका आयोजित करणे योग्य नाही, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने पाठिंबा नाकारल्यास भारत-पाकिस्तान मालिका पुन्हा बासनात गुंडाळली जाऊ शकते. बीसीसीआय क्रिकेट मालिकेसाठी प्रयत्नशील आहे, मात्र केंद्र सरकार अनुकूल नाही.

सरकारच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेला मान्यता मिळवण्यासाठी भारतीय क्रीडा नियामक मंडळ (बीसीसीआय) केंद्र सरकारच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. ‘‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे याबाबतचा पत्रव्यवहार आम्ही केला आहे, परंतु सुषमा स्वराज माल्टा येथे राष्ट्रकुल बैठकीला गेल्या असल्यामुळे त्यांच्या मायदेशी परतण्याची आम्ही प्रतीक्षा पाहत आहोत. त्या परत आल्यानंतर निर्णय घेतील.
– राजीव शुक्ला