ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करणाऱ्या कुलदीप यादवचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. ‘कुलदीप येत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल,’ असे गांगुलीने म्हटले आहे. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यामध्ये कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्यावर हॅटट्रिक घेत कांगारु सामन्यात पुनरागमन करणार नाहीत, याची काळजी घेत कुलदीपने भेदक गोलंदाजी केली.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १४८ अशी झाली होती. यावेळी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड खेळपट्टीवर होता. वेडसोबत स्टोईनिसदेखील मैदानात असल्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र कुलदीपने ३३ व्या षटकात अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या उरल्यासुरल्या आशादेखील संपुष्टात आणल्या होत्या. कुलदीपने ३३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेडचा त्रिफळा उडवला. यानंतरच्या चेंडूवर त्याने अॅश्टन अगरला शून्यावर पायचीत केले. षटकातील चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला झेलबाद करत कुलदीपने हॅट्रिक घेतली. कुलदीप यादव भारताकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनाचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने भारतीय संघाचेही कौतुक केले. ‘भारतीय संघ सध्याचा जगातील सर्वोत्तम संघ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने केवळ २५२ धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला केवळ २०२ धावांवर रोखले. भारतीय संघाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असे सौरव गांगुलीने म्हटले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पुढील सामना इंदूरमधील होळकर स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ मालिकादेखील खिशात घालेल. तर ऑस्ट्रेलियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय गरजेचा आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना डकवर्थ लुईसनुसार २६ धावांनी जिंकला होता.