आर्यन मखिजा, वेदान्त खांडेपारकर, अदिती धुमटकर, युगा बिरनाळे व जोत्स्ना पानसरे यांनी विक्रम प्रस्थापित करीत वरिष्ठ गटाच्या राज्य अिजक्यपद जलतरण स्पर्धेतील पहिला दिवस गाजविला. पुणे संघाने दोन रिले शर्यतीत विक्रम नोंदवीत उल्लेखनीय कामगिरी केली.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेत मुंबईच्या आर्यनने १५०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत १७ मिनिटे १०.४७ सेकंदात पार केली आणि सौरभ संगवेकरने सहा वर्षांपूर्वी नोंदविलेला १७ मिनिटे ३५.४७ सेकंद हा विक्रम मोडला. त्याचाच सहकारी वेदांतने ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत ४ मिनिटे ५३.२४ सेकंदात जिंकली व जेसन स्मिथने २०१४ मध्ये नोंदविलेला ४ मिनिटे ५३.८१ सेकंद हा विक्रम मोडला. पुणे संघाने ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यत एक मिनिट ५०.७३ सेकंदात पूर्ण केली आणि गतवर्षी मुंबई संघाने नोंदविलेला १:५६.८४ सेकंदाचा विक्रम मोडला.

महिला विभागात युगा या स्थानिक खेळाडूने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत एक मिनिट ८.३७ सेकंदात जिंकली आणि जोत्स्ना पानसरे हिचा २०१४ मधील एक मिनिट ८.४६ सेकंद हा विक्रमही मोडला. ठाण्याची खेळाडू जोत्स्ना हिने ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २९.१३ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने अवंतिका चव्हाण हिचा २०१५ मधील २९.२० सेकंद हा विक्रम मोडला. अदिती या मुंबईच्या खेळाडूने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत मोनिक गांधी हिचा २०१४ मधील दोन मिनिटे ११.४४ सेकंद हा विक्रम मोडला. तिने हे अंतर २ मिनिटे ९.६८ सेकंदात पार केले व प्रथम स्थान मिळविले. ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यत पुण्याच्या खेळाडूंनी ४ मिनिटे २९.६३ सेकंदात जिंकताना ठाणे संघाने २००९ मध्ये नोंदविलेला ४ मिनिटे ३२.५० सेकंद हा विक्रम मोडला.

सविस्तर निकाल

पुरुष-१०० मीटर बॅकस्ट्रोक-१.नील गुंडे, २.स्वेजल मानकर. ५० मीटर बॅकस्ट्रोक-१.स्वेजल मानकर, २.श्लोक गुप्ता. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक-१.श्लोक गुप्ता, २.अथर्व देशमुखे. ५० मीटर बटरफ्लाय-१.विराज प्रभू, २.मिहिर आम्ब्रे. २०० मीटर बटरफ्लाय-१.वेदान्त खांडेपारकर, २.प्रज्वल वाघ. ५० मीटर फ्रीस्टाईल-१.विराज प्रभु, २.निमिष मुळे. २०० मीटर फ्रीस्टाईल-१.आर्यन मखिजा, २.वेदान्त खांडेपारकर. १५०० मीटर फ्रीस्टाईल-१.आर्यन मखिजा, २.प्रज्वल वाघ. ४०० मीटर वैयक्तिक मिडले-१.वेदान्त खांडेपारकर, २.आर्यन मखिजा. महिला-१०० मीटर बॅकस्ट्रोक-१.युगा बिरनाळे, २.रायना सलढाणा. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक-१.ऋतुजा परदेशी, २.आर्या राजगुरू. २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक-१.केनिशा गुप्ता, २.सागरिका जैन. ५० मीटर बटरफ्लाय-१.जोत्स्ना पानसरे, २.अवंतिका चव्हाण. २०० मीटर बटरफ्लाय-१.त्रिशा कारखानीस, २.आकांक्षा बुचडे. ५० मीटर फ्रीस्टाईल-१. अदिती धुमटकर, २.अवंतिका चव्हाण. २०० मीटर फ्रीस्टाईल-१.अदिती धुमटकर, २.मोनिक गांधी. १५०० मीटर फ्रीस्टाईल-१.मोनिक गांधी, २.मुस्कान तोलानी. ४०० मीटर वैयक्तिक मिडले-१.ऋतुजा तळेगावकर, २.मुस्कान तोलानी.