लोढा समितीच्या शिफारशींवर महिनाभरात अंमलबजावणी करण्याचे आदेश
लोढा समितीने दिलेल्या शिफारशी योग्य असल्याचे सांगत त्यांची अंमलबजावणी महिनाभरात करावी, असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सांगितले की, ‘‘लोढा समितीच्या शिफारशी या थेट आणि तर्कसंगत आहेत. त्यामुळे त्यांचा अनादर होऊ नये. या शिफारशी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्यांची महिनाभरात अंमलबजावणी करावी.’’
लोढा समितीने ४ जानेवारीला या शिफारशी सादर केल्या होत्या, पण त्यावर कोणतेच भाष्य बीसीसीआयने आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्यायाधीश इब्राहिम कलिफुल्लाह यांच्या द्विसदस्यीय पीठाने या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयला ३ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
या वेळी बीसीसीआयच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड्. शेखर नाफडे यांनी सांगितले की, ‘‘आम्ही तीस सदस्यांना लोढा समितीचा अहवाल पाठवला असून यावर त्यांची मते मागितली आहेत. या रविवारी बीसीसीआयच्या तीनसदस्यीय विधि समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर आम्हाला अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चार आठवडय़ांचा अवधी हवा आहे.’’
न्यायालयाने मात्र अतिरिक्त अवधीची मागणी फेटाळून लावली. न्या. ठाकूर म्हणाले की, ‘‘यापूर्वी बराच अवधी न्यायालयाने यावर खर्च केलेला आहे. लोढा समितीचा अहवाल आम्हाला मान्य आहे आणि तो पूर्णपणे स्वीकाहार्य आहे. त्यामुळे या शिफारशींची अंमलबजावणी व्हायला हवी.’’
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक समस्या येऊ शकतात, असे नाफडे यांनी या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ‘‘बीसीसीआयची तामिळनाडू संस्था नोंदणी कायद्याद्वारे नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करतानाही काही समस्या येऊ शकतात.’’ या युक्तिवादावर द्विसदस्यीय पीठाने सांगितले की, ‘‘यावर सहज मार्ग निघू शकतो. आम्ही सर्व शिफारशी पूर्णपणे स्वीकारल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयला जर या शिफारशींची अंमलबजावणी करताना काही समस्या येत असेल तर ही समिती तुम्हाला मार्गदर्शन करील. त्यानुसार बीसीसीआयची नोंदणी कुठे करायची, या समस्येचे निवारणही ही समिती करेल. शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी बीसीसीआयला सर्वतोपरी मदत करावी, असे आम्ही या समितीला सांगितले आहे. या शिफारशींची अंमलबजावणी करताना आम्हाला जास्त वेळ दवडायचा नाही. या शिफारशींची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीमध्येच व्हायला हवी.’’
लोढा समितीने दिलेल्या शिफारशींमध्ये स्पष्टता आहे, पण बीसीसीआयला जर यामध्ये काही विसंगती वाटत असेल तर त्यावर योग्य तो सल्ला दिला जाईल, असे या द्विसदस्यीय पीठाचे म्हणणे आहे.