‘महाराष्ट्र केसरी’च्या चांदीच्या गदेवर जळगावच्या विजय चौधरीने रविवारी आपले नाव कोरले. अत्यंत अटीतटीने झालेल्या या लढतीत विजयने पुण्याच्या सचिन एलभरे याचा ४ विरुद्ध ३ गुणांनी पराभव करत ४१ वर्षांत प्रथमच उत्तर महाराष्ट्रात किताब खेचून आणले. या विजयानंतर विजयच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
गृहराज्यमंत्री राम शिंदे व ऑलिम्पिकवीर सुशील कुमार यांच्या हस्ते विजयला मानाची चांदीची गदा व एक लाख रुपयांचे पारितोषिक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी विजेता सचिनला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. किताबाची लढत राहण्यासाठी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या पै. छबुराव लांडगे क्रीडानगरीत नगरकर कुस्तीप्रेमींनी अलोट गर्दी केली होती.
१०५ किलो वजनाचा विजय चौधरी निळी जर्सी घालून मैदानात उतरला होता तर ९० किलो वजनाचा सचिन निळ्या जर्सीने. सुरुवातीला विजयने एकेरी पटावर एक गुण वसूल केला. त्यानंतर लगेचच भारंदाज डावावर २ गुण मिळवत एकूण ३ गुणांची आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या फेरीत विजय ३-० अशा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत विजयने दुहेरीपट काढण्याचा प्रयत्न केला, तो सचिनने हाणून पाडला. विजयने पुन्हा एकेरी पटावर एक गुण वसुल केला. विजयची ही आघाडी वाढत असतानाच सचिन आक्रमक झाला व त्याने एक गुण घेतला. मात्र तीन मिनिटांची दुसरी फेरी संपली व विजयला विजयी घोषित करण्यात आले. त्यावेळी मैदानात एकच जल्लोष करण्यात आला.
विजय सध्या पंजाबमधील गुमछडी येथे रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तत्पूर्वी त्याने पुण्यातील मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्रात रुस्तुम-ए-हिंदू अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखालीही धडे गिरवले. तो मुळचा चाळीसगावचा. त्याचे वडिल नथुराम चौधरी यांनी शेती करत मल्लविद्याही जोपासली.

पुण्याला सर्वसाधारण  विजेतेपद
प्रतिनिधी, नगर
नगरला झालेल्या ५८व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी लढतीत पुणे जिल्हा संघाने ५७ गुण मिळवत माती व मॅट या दोन्ही विभागांत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर उपविजेतेपद माती विभागात सोलापूर जिल्हा संघाने व मॅट विभागात कोल्हापूर जिल्हा संघाने मिळवले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पुणे जिल्हा संघातील उत्कर्ष काळेने पटकावला.
गटनिहाय विजेते :
*मॅट-७० किलो : १. रवींद्र कर्हे (पुणे), २. कुमार शेलार (कोल्हापूर), ३. तानाजी वीरकर (सातारा) व पांडुरंग मोरे (सोलापूर). ८६ किलो : १. संतोष गायकवाड (नगर), २. किरण भगत (सोलापूर), ३. हर्षवर्धन सदगीर (नाशिक) व संजय सूळ (सातारा). ९७ किलो : १. संतोष लहुटे (कोल्हापूर),२. साईनाथ रानवडे (पुणे), ३. गणेश जगताप (सोलापूर) व विक्रम वडितले (नांदेड).
*माती – ७० किलो : १. बाबासाहेब डोंबळ (पुणे), २. विक्रम शेटे (नगर), ३. अनिल चव्हाण (कोल्हापूर). ८६ किलो : १. अनिल जाधव (नांदेड), २. अनिल ब्राह्मणे (नगर), ३. सोनबा काळे (पुणे). ९७ किलो : १. किरण भगत (सातारा), २. भारत मदने (पुणे), ३. संतोष दरवडे (सोलापूर).