प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर प्रत्येक दिवस नवीन घडामोडी समोर येतायत. ‘टेलीग्राफ’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार दोघांमधला विसंवाद हा इतक्या टोकाला गेला होता की कुंबळेंनी जर आपल्या पदाचा राजीनामा दिला नसता तर कोहली कर्णधारपद सोडण्याच्या विचारात होता.

टेलीग्राफ ने दिलेल्या वृत्तानुसार, कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्यावर विराट कोहली ठाम होता. बीसीसीआयने लवकरात लवकर कुंबळेंचा उत्तराधिकारी शोधावा असंही कोहलीचं मत होतं. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय, बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी कोहलीने याविषयावर चर्चाही केल्याचं कळतंय. पण या पलिकडे जाऊनही जर बीसीसीआयने सचिन,गांगुली आणि लक्ष्मण सदस्य असलेल्या सल्लागार समितीचं मत ग्राह्य धरलं असतं तर कोहली राजीनामा देण्याच्या तयारीत होती.

गांगुली, सचिन आणि लक्ष्मणची सल्लागार समिती ही सुरुवातीपासून कुंबळेला प्रशिक्षकपदावर बढती देण्याच्या विचारत होती. याआधीही कोहली आणि कुंबळे यांच्यात गेल्या ६ महिन्यापासून कोणताही संवाद होत नव्हता. सल्लागार समितीने केलेल्या मध्यस्थीनंतरही दोघांमधले संबंध काही केल्या सुधारण्याचं नाव घेत नव्हते. दोघांमधले संबंध सुधारले जातील या आशेवर सल्लागार समितीने कुंबळेंना वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला आणि हा वाद आणखीन उफाळून वर आला.

उद्यापासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार असून जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल असं कालच बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण होणार हे पहावं लागेल.