टीम इंडियाचा युवा खेळाडू विराट कोहलीने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी तीन वर्षांत विराट कोहली देशभरात ७५ ठिकाणी जिम सुरु करणार असून यासाठी तो सुमारे ९० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड एण्टरटेन्मेंटच्या (सीएसइ) संयुक्त विद्यमाने एकूण १९० कोटींच्या प्रकल्पात विराट ९० कोटी रुपयांची भागीदारी देणार असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. चिसेल फिटनेस या ब्रँडखाली देशभर जिम आणि फिटनेस सेंटरच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
याआधी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही फिटनेस क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ‘स्पोर्ट्स फिट’ नावाची जिम आणि फिटनेस सेंटर्स धोनीने सुरू केली आहेत. आता धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत विराट देखील फिटनेस सेंटरच्या उद्योग क्षेत्रात एण्ट्री घेत आहे. फिटनेस क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी कोहलीने इंडियन सुपर लीग या फुटबॉल लीगमधील गोवा एफसी संघात गुंतवणुक केली आहे. मात्र, उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची कोहलीची ही पहिलीच वेळ आहे.