अस्थिमज्जेशी संबंधित मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांमध्ये ग्रीन टीमधील संयुग गुणकारी ठरते असे दिसून आले आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधनानुसार एपिगॅलोकॅटेसिन ३ गॅलेट हे संयुग पॉलिफेनॉल गटातील असून ती ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून येते. ते मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपकारक ठरते.

लाइट चेन अमायलोयडोसिस या रोगात शरीराच्या एका भागातील प्रतिपिंड विविध अवयवांमध्ये पसरतात, त्यात हृदय व मूत्रपिंडाचा समावेश असतो. यात लाइट चेन अमायलोयडोसिसचा उलगडा आवश्यक होता व त्यावर ग्रीन टीमधील संयुग कसे काम करते हे समजते असे वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जॅन बिशके यांनी म्हटले आहे. लाइट चेन अमायलोयडोसिस अस्थिमज्जा रोगाच्या रुग्णांमधून वेगळे काढले गेले व नंतर त्यावर ग्रीन टीमधील संयुगाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले.

एपिगॅलोकॅटेसिन ३ गॅलेट या संयुगाचा परिणाम पार्किन्सन व अल्झायमर या रोगांमध्ये तपासण्यात आला. त्यात दोन्ही रोगांत साचत जाणाऱ्या घातक प्रथिनांना हे संयुग अटकाव करते असे दिसून आले.

लाइट चेन अमायलोयडोसिसची पुनरावृत्ती व त्यांचे साचत जाणे यात थांबवले जाते.