खाद्यसंस्कृती आणि रेसिपीवरील पुस्तकांचा बाजारात सुळसुळाट झालेला असतानाच ‘खाद्यसंस्कृती’ या विषयावरचं एक आगळं आणि वेगळा दृष्टिकोन मांडणारं ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे शाहू पाटोळे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. वाचकांच्या मेंदूला झिनझिनाट आणणारं हे पुस्तक आहे.

आजपर्यंत आपण ‘जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असं म्हणत आणि मानत आलेलो आहोत. परंतु अन्न हे पोट भरण्यासाठीच असते आणि एवढंच नव्हे तर त्याला जातही असते. जातीमुळे अन्नाचे अनेक उपप्रकार उदयाला येतात, तसेच जातिविचारही प्रबळ होतो, असे मूलभूत आणि परखड विचार शाहू पाटोळे यांनी यात मांडले आहेत.

‘शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार?’ हा वाद वर्षांनुवर्षे चर्चिला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या आहाराचे समर्थन करतो आहे. परंतु शाहू पाटोळे याहीपुढे जाऊन मुळात कुणी काय खावे, ही ज्याची त्याची वैयक्तिक खासगी बाब आहे असे सांगतात. सात्त्विक खाण्यामुळे माणूस सत्शील बनत असता, तर एतद्देशीय संस्कृतीत जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था कशाला टिकली असती, असा प्रश्न ते उपस्थित करतात. शाकाहाराची हेटाळणी करणे किंवा प्रतिवाद करणे हा त्यांच्या पुस्तक लिहिण्यामागचा हेतू वा उद्देश नसून, या अनुषंगाने अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा आणि वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा धांडोळा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या मनोगतात लेखक लिहितो की, ‘संस्कृतीच्या विकासात आहार, विहार, आचार आणि खाद्यसंस्कृती यांचाही निरंतर विकास होत असतो. एतद्देशीय संस्कृतीत सर्वसमावेशक खाद्यसंस्कृतीचा विकास होण्याऐवजी ती वर्ण आणि जातिव्यवस्थेत बद्ध झाल्याचे आढळते. सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन आहारवर्ग ठरवून त्यांना वर्णबद्ध करण्यात आले. ज्या प्रकारचा आहार जो वर्णिक घेतो, तशी त्याची वृत्ती आणि मानसिकता असते, हा निर्णय व निष्कर्ष धर्मग्रंथ आणि त्यांच्या पाठिराख्यांनी घेऊन टाकला आणि त्याला विरोध करण्याची कुणाचीही बिशाद नव्हती,’ असा निष्कर्ष स्वत: लेखकाने अभ्यासांती काढला आहे. त्यासाठी अनेक अभ्यासग्रंथ त्यांनी अभ्यासले आहेत. यातूनच ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे ऐतिहासिक दस्तावेज ठरू शकणारे पुस्तक तयार झाले आहे.

खाद्यसंस्कृतीविषयीची चर्चा करीत असताना केवळ उच्चवर्णीय ते मध्यमवर्गीय यांच्याच खाण्यापिण्याच्या, स्वयंपाकाच्या पाककृतींबद्दल चर्चा केली जाते. परंतु पहिल्यांदाच सत्तरीच्या दशकात दलित साहित्य मोठय़ा प्रमाणात येऊ  लागले. या साहित्याने मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला धडका देण्याचे काम केले. दलित साहित्यात त्यांना उपजीविकेसाठी खाव्या लागणाऱ्या अन्नाचा उल्लेखही यायला लागला. तेव्हा यांचीही एक वेगळी खाद्यसंस्कृती असते, याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. परंतु दलित साहित्यात उल्लेख असलेल्या दलितांच्या खाद्यजीवनाबद्दल, त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल कुणी सविस्तर मागोवा वा संशोधन केले नाही. दलित गावकुसाबाहेर राहिले तशी त्यांची खाद्यसंस्कृतीसुद्धा राहिली. शाहू पाटोळे यांच्या हे लक्षात आल्यामुळे त्यांनी या मंडळींच्या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण करायचे ठरवले. त्यातूनच हा ग्रंथ तयार झाला आहे.

या पुस्तकात महाराष्ट्रातील महार आणि मांग या उपेक्षित जातींतील प्रमुख आहार आणि काही पदार्थ शब्दबद्ध करण्याचा आणि सामाजिक, धार्मिक श्रेणीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे पुस्तक सात प्रकरणांत लिहिले गेले असून, खाद्यसंस्कृतीची सुरुवात व ओळख, दलितवर्गाची खाद्यसंस्कृती, त्यांचे सामाजिक स्थान, दलित खात असलेल्या अनेक खाद्यपदार्थाची नावे आणि त्यांच्या पाककृती, काही लोककथा आणि संतवाङ्मयातील खाद्यजीवनाचा आढावा त्यात घेण्यात आलेला आहे.

पड, हेळ्या, हलाल, रगती, जीभ, फाशी, मेंदू, काळीज, बोकं, फोफिस, दिल, उंडवर, मांसकंड, उराडी, पेकाट, खांड, वशाट, चलबट, टोना, बळ, वसू, मांड, फरदूळ, बोटय़ा, गणा, डल्लय़ा, सुकेखांड, चाण्या, खुरं, चुणचुणं, चाटीबोटी, आंबळगाट, चाकळा, लाकुती, पारकंड, सागुती हे शब्द तुम्ही-आम्ही ऐकलेलेसुद्धा नाहीत. हे आहेत प्राण्यांच्या विविध अवयवांचे, तत्सदृश मांसाचे उल्लेख. या सर्व शब्दांचे अर्थ सांगत लेखकाने त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे. त्यापासून बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या पाककृतीही लेखकाने पुस्तकात दिलेल्या आहेत. हे केवळ खाद्यसंस्कृतीवरचे पुस्तक नाही, तर तत्कालीन प्रथा, परंपरा, रीतिभाती यांवर सामाजिक अंगाने प्रकाश टाकणारे पुस्तक आहे. लेखकाची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धती, त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे, उपस्थित केलेले प्रश्न भोवंडून टाकणारे आहेत. हे करीत असताना लेखकाने या  वर्गाच्या खाद्यसंस्कृतीबरोबरच बोलीभाषेतून आलेले त्यासंबंधीचे अनेक शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचा चपखल वापर केला आहे.

संतवाङ्मयातील खाद्यजीवनाचा आढावा घेणाऱ्या प्रकरणात लेखकाने वैचारिक पाया समजून घेण्यासाठी भागवतधर्माचा अभ्यास केला. खाद्यसंस्कृती समजून घेण्यासाठी त्यांनी लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांची अभंगगाथा, चांगदेवांचे अभंग, श्री संत नामदेवगाथा, संत जनाबाईंच्या अभंगांबरोबरच संत जनार्दनस्वामी, संत निळोबा, सावता माळी, चोखामेळा, सोयराबाई, संत बंका, संत कर्ममेळा, श्रीसंत तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा आणि इतर महत्त्वाच्या संतसाहित्याचा अभ्यास करून आपले निष्कर्ष मांडले आहेत. सामाजिक अंगाने केलेला अभ्यास हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. खाद्यसंस्कृतीकडे याही दृष्टिकोनातून पाहता येते, हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.

‘अन्न हे अपूर्णब्रह्म’- शाहू पाटोळे, जनशक्ती वाचक चळवळ,

पृष्ठे- १६८, मूल्य- २०० रुपये. ल्ल

-श्याम देशपांडे  deshpande.shyam07@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.