१ जूनपासून पेरणी बंद आंदोलनाचा इशारा ; राज्यभरातून प्रतिसाद

कर्जमुक्तीने सातबारा उतारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य न केल्यास १ जूनपासून शेतकरी ‘पेरणी बंद’ ठेवून संपावर जाणार असल्याचा एकमुखी ठराव सोमवारी पुणतांबा येथे झालेल्या विशेष ग्राम सभेत करण्यात आला. असा अनोखा संप करण्याचा निर्णय घेऊन या आंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेला परिसराच्या ४० गावांसह नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.

पुणतांबा येथील सभेत कर्जमुक्त सातबारा कोरा झालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, दुधाला प्रतिलिटर ५० रु. दर, कृषीपंपासाठी मोफत वीज व शेतीला शाश्वत पाणी मिळावे, शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी, ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान मिळावे, शेतीमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. येथील सरपंच छाया जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली.

नक्की काय झाले?

२५ मार्चला झालेल्या येथील चिंतन बैठकीत शेतकऱ्यांनी संपावर जाण्यासंदर्भात विचार मांडला होता, त्या अनुषंगानेच या ग्रामसभेला परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्कांच्या मागण्याबाबत सरकाराला निर्णय घेणे, तसे ठराव प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला पाठवणे, टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वदूर अशा ग्रामसभा व ठराव घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्काचा लढा शांततेच्या मार्गाने लढण्याचा निर्णय घेऊन या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांची जनजागृती करण्यासाठी मोहीम उभारण्यात येणार आहे.

दूध, भाजीपाला रोखणार..

यापूर्वीही शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे प्रयत्न केले होते, त्यातून ऊसतोड, दूधबंद आंदोलने झाली. परंतु  सरकारने फूट पाडली. आपसातील मतभेद विसरून पेरणी बंद आंदोलन यशस्वी करावे, पुणतांबा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या अनोख्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या ठरावाला ग्रामसभेने सर्वानुमते मान्यता देऊन १५ मेला मेळावा घेऊन दूध आणि भाजीपाला बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात येणार असून, यानंतरही सरकारला जाग न आल्यास १ जूनपासून पेरणी बंद ठेवून शेतकरी संपावर जातील, असा निर्णय घेण्यात आला.