कविता गायकवाड यांच्या हस्ते सुनील आढाव लिखित पुस्तकाचे प्रकाशन
सर्वव्यापी प्रेम फक्त त्याला आणि तिलाच माहीत असते. कारण प्रेमात पडलेल्यांचं सर्वच कसं वेगळं असतं. जगाचं जरादेखील भान नसते. अशा या प्रियकर आणि प्रेयसीच्या अंतर्मनातील संवाद सुनील आढाव यांनी शब्दबद्ध केला आहे. सुनील आढाव लिखित ‘प्रीत: प्रेमवीरांच्या मनातलं तरल प्रतिबिंब’ या पुस्तकाचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड यांच्या हस्ते झाले.
नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसाचे औचित्य जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात हा छोटेखानी समारंभ पार पडला. अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार यांनी प्रास्ताविकात सुनील आढाव यांच्या या पुस्तकामागची संकल्पना स्पष्ट केली. अलीकडे एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ला होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक प्रेमवीरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे त्यांनी सांगितले. अलिबागच्या सरस्वती प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या समारंभास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी लक्ष्मण पाटील, लेखाधिकारी मंगेश गावडे, सरस्वती प्रकाशनचे राजन वेलकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष हर्षद कशाळकर, जिल्हा परिषदेतील कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी लेखन सुनील आढाव यांनी अध्यक्षा कविता गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रीमती गायकवाड यांनी लेखक सुनील आढाव व प्रकाशक राजन वेलकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.