शरद पवार यांचे उद्गार

महाराष्ट्राला दिशा देण्यात आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यात गोविंदराव तळवलकर यांचे महत्त्वाचे योगदान होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत केले. दिवंगत तळवलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने नरिमन पॉइंट येथील प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात ‘स्मृतीसभा’ आयोजित केली होती.

या वेळी पवार म्हणाले की, स्वत:ला जे पटेल आणि योग्य वाटेल ते बोलणारे आणि लिहिणारे असा तळवलकर यांचा स्वभाव होता. विचारवंत, लेखक, राजकारणी, बुद्धिजीवी वर्गाबरोबरच ते सर्वसामान्य शेतकऱ्याबरोबरही रमणारे होते. त्यांनी लिहिलेले अग्रलेख हा नेहमीच महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय असायचा असे स्पष्ट केले.

पवार यांनी मनोगतात ‘पुल’, ‘गदिमा’ यांच्याबरोबर गोविंदरावांच्या रंगलेल्या मैफली, त्याचे आपण स्वत: असलेलो साक्षीदार, वसंतदादा पाटील यांचे तेव्हा पाडलेले सरकार, त्यासाठी गोविंदराव यांचे पडद्याआडून आणि अग्रलेखातून मिळालेले मार्गदर्शन अशा विविध आठवणींना उजाळा दिला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी तळवलकर यांचा ‘राजस अलिप्तता’ जपून आपल्या संपादकपदाचा चांगल्या अर्थी ‘अहम’ असलेले आणि प्रत्येक विषयावर कणखर बुद्धिवादी भूमिका घेणारे संपादक अशा शब्दांत गौरव केला. चांगली पत्रकारिता चांगला व्यवसाय करू शकत नाही असा समज त्यांनी खोटा ठरविला आणि हे दोन्हीही कसे उत्तम प्रकारे करता येऊ शकते त्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिल्याचेही कुबेर म्हणाले.

विनायक पाटील यांनी तळवलकर हे शब्द, ज्ञान, माहिती यांचे भांडार होते. ते पत्रकारितेशी ते एकाग्र झाले. तेच त्यांचे ध्येय आणि ध्यास होता, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक अशोक पानवलकर यांनी तळवलकर यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आणि दरारा तेव्हाही होता, आजही आहे असा माणूस पुन्हा होणे नाही, असे सांगून ‘मटा’मधले आपले सुरुवातीचे दिवस, पुढे ‘मटा’चे संपादक झाल्यानंतर गोविंदराव यांच्याशी वाढलेला संवाद, त्यांचा व्यासंग, दांडगी स्मरणशक्ती, विद्वत्ता आदी आठवणींना उजाळा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.