आरोपींना ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यांना साकडे

नूतनीकरणानंतर डिजिटल झालेल्या वनसभागृहाच्या उद्घाटनाचे सोपस्कार वनखात्याने पार पाडले, पण त्याच परिसरात तयार असलेल्या वनकोठडीच्या उद्घाटनाचा मुहूर्त मात्र वनखात्याला गेल्या दोन वर्षांपासून सापडलेला नाही. त्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत वनकोठडी अडकल्याने अजूनही वनखात्याच्या आरोपींना ठेवण्यासाठी सीताबर्डी आणि सदर पोलीस ठाण्याकडे साकडे घालावे लागते.

चार वर्षांपूर्वी नागपूर वनविभागाने विषाच्या तस्करी प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली, त्यावेळी न्यायालयीन प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांना ठेवायचे कुठे आणि त्यांची चौकशी कुठे करायची, असा प्रश्न वनाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. त्यावेळी वनसभागृहातच त्यांची चौकशी करण्यात आली आणि रात्रभर वनसभागृहासह वनखात्याच्या सचिवांच्या कक्षात आरोपींना ठेवण्यात आले. या प्रकरणाची प्रसारमाध्यमांमध्ये वाच्यता झाल्यानंतर तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी सेमिनरी हिल्सवरील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात वनकोठडीचा प्रस्ताव तयार केला. अवघ्या वर्षभरात लाखो रुपये वनकोठडी तयारही झाली, पण तिच्या उद्घाटनाचा मुहूर्त मात्र अजूनपर्यंत वनखात्याला सापडला नाही. दरम्यानच्या काळात जून २०१५ मध्ये तब्बल १०० कासवांची तस्करी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आणि आरोपींना वनखात्याच्या स्वाधीन केले. ऑगस्ट २०१५ मध्ये पुन्हा एकदा कासवांची तस्करी आणि आरोपींना अटक करण्यात आली. त्याचवेळी वाघांच्या शिकारीचीही एकापाठोपाठ एक प्रकरणे उघडकीस येत गेली आणि या प्रकरणांमध्ये मोठय़ा संख्येने आरोपी शिकाऱ्यांना अटकही करण्यात आली. मात्र, अटकेनंतर न्यायालयात नेईपर्यंत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. त्यावेळीसुद्धा शहरातील दोन पोलीस ठाण्यांकडे वनविभागाला आरोपी ठेवण्यासाठी साकडे घालावे लागले. वनसभागृहापासून पावलांच्या अंतरावर ही वनकोठडी आहे. यानंतर वनसभागृहाचे नूतनीकरण झाले आणि उद्घाटनही पार पडले, पण वनकोठडीच्या उद्घाटनासाठी वनविभाग कशाची प्रतीक्षा करीत आहे, हे कळायला मार्ग नाही.

वन आणि वन्यजीव गुन्हे

*  सापांना पकडून  त्यांच्या विषाची तस्करी.

*  वाघांच्या शिकारी आणि अवयवांची तस्करी.

*  इतरही वन्यप्राण्यांच्या शिकारी आणि तस्करी.

*   पक्ष्यांच्या शिकारी आणि तस्करी.

*  अवैध वृक्षतोड आणि तस्करी.