‘लोकसत्ता लोकांकिके’च्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तरुणाईचा जागर शुक्रवारी अंतिम फेरीत शांत झाला. मागील २०-२५ दिवस एकांकिकेचाच विचार डोक्यात घेऊन वावरणाऱ्या पाचही महाविद्यालयांच्या एकांकिका सरस होत्या. त्यातील लायसन्सने सवरेत्कृष्ट एकांकिकेबरोबरच सर्वात जास्त पारितोषिके पटकावली. त्यामुळे त्यांचा आवाज सभागृहात बुलंद होता. गणपत्ती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत ते एकेक पुरस्कार संपादित करीत होते. सभागृहातील रसिकांनाही ‘लायसन्स’लाच पसंती दिली. शिवाय कस्र्ड किंग, मलबांलाही उपस्थितांनी चांगली पसंती दिली.

[jwplayer wN2mCKjd]

लोकांकिकाच्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची द्वितीय फेरी आणि विभागीय अंतिम फेरी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यात कलावंतांसह, महाविद्यालयातील प्राध्यापक, कलावंतांचे पालक व त्यांचे शालेय शिक्षक तसेच त्यांचे नातेवाईक आणि ‘लोकसत्ता’च्या वाचकांनीही एकांकिकांचा आस्वाद घेतला. सर्वच एकांकिकांचे कौतुक झाले. कारण विषय अगदीच वेगवेगळे असल्याने त्यात मजा वाटली. तरुणाईने केवळ आजची अंतिम फेरीच नव्हे तर गेले काही तालमीतले दिवसही तहान, भूक विसरून केवळ जिंकायचेच या ईर्षेने एन्जॉय केले.

आजच्या एकांकिकांमध्ये रेनायसन्स महाविद्यालयाची ‘मलबा’, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाची ‘कस्र्ड किंग’, डॉ. विठ्ठलराव खोबरागडे महाविद्यालयाची ‘उपोषण’, चंद्रपूरच्या यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालयाची ‘लायसन्स’ आणि धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘भारत अभी बाकी है’ या पाच एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या. प्राथमिक फेरीच्यावेळी परीक्षकांनी सुचवलेल्या सूचनांचा आदर राखीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृतींमध्ये सुधारणा केली होती. मात्र, तरीही योग्य उच्चार, भाषेतील चढउतार आणि संवाद फेकीत आमचा संघ मागे पडल्याच्या भावना काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या.

सायंटिफिक सभागृहात पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीचे उद्घाटन परीक्षक अजित भुरे यांनी केले तर समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. रंजन दारव्हेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी दारव्हेकर यांनी एकांकिका म्हणजे ‘वन डे’ सारखी असते. कमी वेळेत जास्तीत जास्त धावा काढताना मेहनत आणि कौशल्यही झळकले पाहिजे, असे उद्गार काढले. संचालन ज्ञानेश्वर महल्ले यांनी केले तर आभार वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे यांनी मानले. उद्घाटन आणि समारोपाला विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे उपस्थित होते.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह’ अकॅडमी व ‘झी युवा’ यांचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहेत. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर ‘आयरिश प्रॉडक्शन’ असून गेली तीन वर्षे ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवरील तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या पारितषिकांपोटी यंदा साडेतीन लक्ष रुपयांची बक्षिसे घोषित करण्यात आले आहेत.

उच्चारांवर भर देण्याची गरज

‘लोकसत्ता’ने उपलब्ध केलेले ‘लोकांकिका’ हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा त्यांनी त्यांच्या बुद्धी व कौशल्यानुसार वापर केला आणि ते कलाकृतीत उतरवले. खरे तर सर्वच एकांकिकांमध्ये वैविध्य होते. वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुवतीनुसार हाताळले. असे असले तरी वाचिक किंवा उच्चारांवर जास्त भर देण्याची गरज आहे. शिवाय एकांकिकेची जी लय असते ती वाहती ठेवणे या काळजी एकांकिकाकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे.

-अजित भुरे, परीक्षक, लोकांकिका.

[jwplayer vs9zGYJ0]