मुख्यमंत्र्यांची घोषणा; देशातील पहिल्या ‘ई-टॅक्सी’ सेवा व इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशनचे उद्घाटन

पर्यावरणपूरक ई-वाहन परिवहन सेवेत उतरवून नागपूर शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर झाले आहे. या वाहनांसाठी चार्जिग स्टेशनची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सरकार लवकरच यासंदर्भात धोरण तयार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली.

ओला आणि महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘ई-टॅक्सी’ सेवा आणि इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशनचे उद्घाटन फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ई-वाहनामुळे २१व्या शतकात मोठी क्रांती घडणार असून यातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शहरात दोन ई-बस, आणि शंभर ई-टॅक्सी, ई-ऑटो धावणार आहेत. यासाठी चार्जिग स्टेशन व इलेक्ट्रिक अभियंत्यांची आवश्यकता भासणार आहे. विजेचा इंधन म्हणून होणारा वापर पर्यावरणासाठी हितकारक आहे. त्यातही सौर ऊर्जेचे स्टेशन तयार होत असल्यामुळे विजेची बचत होईल. एकीकडे महागडे पारंपरिक इंधन आणि दुसरीकडे विजेवर वाहने धावल्यास कमी खर्च येणार आहे. त्यामुळे स्वच्छ हिरव्या इंधनाची सुरुवात नागपुरातून होईल. यातून स्मार्ट सिटीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक शुद्ध पर्यावरणाकडे शहराची ही वाटचाल सुरू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, प्रदूषणमुक्त परिवहनासाठी योजना तयार करण्यात आली आहे. ई वाहनामुळे चार्जिग स्टेशनची मागणी वाढल्यास स्टेशन निर्माण करण्यात येईल आणि रोजगार वाढणार आहे. शंभर टक्के ई वाहन देशात चालविल्यानंतर शुद्ध पर्यावरणाकडे देशाची वाटचाल होईल. क्रुड ऑईल आयात कमी होईल. माणूस माणसाला ओढत असताना हा प्रकार बंद करण्यासाठी शहरातील प्रत्येक सायकलरिक्षा चालकाला ई रिक्षा किंवा ऑटो स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे शहरात सायकलरिक्षा दिसणार नाहीत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही यावेळी भाषण झाले. अभय दामले यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.

कार्यक्रमाला महेंद्र अ‍ॅन्ड महेंद्र कंपनीचे प्रमुख पवन गोयंका, ओला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश अग्रवाल, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, शहरातील आमदार उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार

शहरात ई परिवहन व्यवस्था सुरू केली जाणार असून त्यासाठी वाहन चालकाची मोठय़ा संख्येत आवश्यकता भासणार आहे. हे चालक नागपूर किंवा जिल्ह्य़ातून घेतले गेले पाहिजे. स्कील सेंटर सुद्धा या ठिकाणी केले पाहिजे आणि युवकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. मात्र, तसे करण्यात आले नाही तर ई परिवहन व्यवस्थेचे संचालन करणाऱ्या कंपन्यांची मदत बंद केली जाईल, असा दम गडकरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. शहरात जुन्या ऑटोरिक्षाचालकाचे काय, असा प्रश्न निर्माण करण्यात आला असला तरी त्यांचे पेट्रोल व डिझेलवर चालणारे ऑटो ई रिक्षाच्या स्वरूपात करण्यात येणार आहे.

बसस्थानकही स्मार्ट होणार

वाहतुकीच्या क्षेत्रात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असताना लातूर आणि नागपूरचे बसस्थानक ‘फाईव्ह स्टार’ करण्यात येणार आहे. समाजातील गरीब माणूस हा बसने प्रवास करीत असल्यामुळे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या, या उद्देशाने बसस्थानक अत्याधुनिक करण्यात येणार आहे. बसेस वातानुकूलित करण्यात येईल आणि स्थानक आकर्षक आणि अत्याधुनिक पद्धतीने तयार केले जाणार आहे.