डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बìमगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले.
या वेळी भारताच्या अवकाश संशोधनशास्त्राचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमासाठी भारतात बोलावून घेतले. १९६७ साली ते थुम्बा येथे रुजू झाले. अग्निबाणांसाठी लागणारे घन इंधन बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यासाठी त्यांनी
प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लान्ट अशी युनिट्स स्थापन केली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वष्रे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे. १९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. त्यांच्या संचालकपदाच्या काळात एसएलव्ही -३ प्रकल्पात अग्निबाणाच्या सहाय्याने भारताच्या पहिल्या उपग्रहाचे उड्डाण होऊन तो पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला.  १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. विज्ञान सर्वसामान्यांच्या मनात रुजावे म्हणून त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. गेली २७ वष्रे सुरू असलेला राष्ट्रीय विज्ञान दिन १९८७ पासून त्यांनी सुरू केला. देशातील विज्ञान प्रसारकांना पुरस्कार देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. देशभर विज्ञान प्रसाराचे अनेक कार्यक्रम या खात्यामार्फत त्यांनी सुरू केले. याच काळात त्यांच्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या हवामान खात्यातर्फे १६ परिमाणांच्या आधारे त्यांच्या प्रेरणेने मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त व्हायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या नियोजनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. १९९७ पासून त्यांनी शेतीच्या खतांचा विश्वकोश तयार करून जगभरच्या शेतकऱ्यांसाठी जगातला पहिला कोश २००५ मध्ये उपलब्ध करून दिला. आज या कोशाला जगभर प्रचंड मागणी आहे.
प्रबोधन पर्व: जाणता आणि कर्ता
ब्रिटिशपूर्व भारतातील ज्या मोजक्या संस्थानिकांना आपल्या प्रजेचे हित आणि सामाजिक सुधारणा याविषयी आस्था होती, त्यामध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सांगलीचे पटवर्धन आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांचा समावेश होतो. लोकशाही हे सुराज्य असले पाहिजे, अशी शाहू महाराजांची धारणा होती आणि त्या लोकशाहीचा आत्मा मानवी समतेमध्ये आहे, हेही त्यांनी ओळखले होते. म्हणूनच अस्पृश्यता आणि जातिभेद यांच्या निर्मूलनासाठी त्यांनी आपल्या संस्थानात जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर स्वत: अस्पृश्यांना हॉटेल्स काढून देऊन तिथे जाऊन त्यांनी इतरांसाठी नवा कित्ता घालून दिला. स्वराज्याचे सुराज्य व्हावे आणि त्यासाठी बहुजन समाजातून नवे नेतृत्व पुढे आले पाहिजे, अशी शाहू महाराजांची धारणा होती. समाजातील सर्व थरांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या संस्थानात मोठय़ा प्रमाणावर बोìडग्ज काढल्या. १९१८ साली अस्पृश्य समाजाला न्याय देण्यासाठी जी आज्ञापत्रे त्यांनी काढली, त्यातून त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि साहसी ध्येयवाद दिसून येतो. दलित विद्यार्थ्यांना सवर्ण विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षण दिले पाहिजे, असे फर्मान त्यांनी आपल्या संस्थानात आज्ञापत्रांद्वारे काढले. महार वतने नष्ट करून अस्पृश्यांना शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ही सुधारणा तत्कालीन मुंबई राज्यात व्हायला १९९८ साल उजाडावे लागले. देवदासींची प्रथाही शाहू महाराजांनी बंद केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रथेबाबत रीतसर कायदा केला गेला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शाहू महाराजांविषयी म्हणतात, ‘‘विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राचा जो राजकीय व सामाजिक इतिहास घडला, त्यात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला वर्तमान काळात पूज्य झालेल्या दोनच व्यक्ती सांगता येतील. एक जोतिबा फुले व दुसरे शाहू महाराज.’’  
मनमोराचा पिसारा: इनव्हिजिबल गोरिला
‘दिसतं तसं नसतं’ ही म्हण सर्वपरिचित आहे. परंतु, या म्हणीच्या अर्थाचं वेगवेगळ्या प्रकारे निरुपण (?) करता येतं आणि विरुद्ध अर्थही काढता येतो. उदा. दिसतं तसं असतं, हे गृहीत धरता येतं का? असतं तसं दिसतं? आणि नसलेलं दिसतं तेव्हा ते असतं का? असे अनेक फाटे उपफाटे आपण बसल्या बसल्या फोडू शकतो. परंतु हार्वर्डमधील मानसशास्त्र विभागाला अशाच ‘असतं ते दिसतं का?’ या प्रश्नाने खुणावलं आणि ‘इनव्हिजिबल गोरिला’ नावाचा जगप्रसिद्ध प्रयोग सिद्ध झाला. ख्रिस्तोफर श्ॉब्री आणि डॅनिएल सायमन्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने हार्वर्ड विद्यापीठात हा प्रयोग केला.
प्रयोगाचा कालावधी केवळ एक ते दीड मिनिटांचा आहे. कॉलेजच्याच डॉर्ममध्ये काळ्या व पांढऱ्या शर्टमधली पाच-सहा मुलं बास्केटबॉलशी खेळत असतात. मुलं एकमेकांकडे बॉल पास करतात. त्या व्हिडीओमध्ये दिसणारे बॉलचे पास पाहणाऱ्यांनी मोजायचे. उदा. काळ्या शर्टमधील मुलांनी किती वेळा बॉल पास केला..
हा खेळ घडत असताना काही सेकंदांकरिता गोरिलाची वेशभूषा केलेली व्यक्ती त्या खेळाडूंच्या मधून जाते. काही सेकंदांकरिता कॅमेराकडे पाहून छातीवर हात आपटून घेते. खेळ चालूच असतो.
व्हिडीओ पाहिल्यावर मुलांनी बॉल किती वेळा पास केला याचे उत्तर विचारले. बहुतेक मुलांनी अचूक उत्तर दिले. ‘तुम्ही हा खेळ चालू असताना काही उफराटे (विचित्र-अनपेक्षित) पाहिले का?’ यावर पन्नास टक्के मुलांनी ‘नाही’ असे उत्तर दिले म्हणजे त्यांना व्हिडीओमधला गोरिला असून दिसला नाही.
याचा अर्थ त्या मुलांनी गोरिला बघितला, पण तो त्यांना दिसला नाही! बघितला नक्की. कारण त्यांचं लक्ष व्हिडीओच्या फ्रेमवर होतं. आणि गोरिलाने कॅमेरात बघून छाती पिटली होती. हे बघूनही त्यांना दिसलं नाही!
या प्रयोगाने एकच खळबळ उडाली. कारण पन्नास टक्के मुलांना गोरिला दिसला नव्हता. या प्रयोगाची अनेक वेळा फेरतपासणी केली तरी निरीक्षणं कायम तीच राहिली. अर्थात नवनवीन आणि अजाण (नॉव्हिस) लोकांवर हा प्रयोग करण्यात आला.
जग मायावी आहे असं आपण म्हणतो तेव्हा दिसतं तसं नसतं किंवा नसलेलं दिसतं असा त्याचा अर्थ होतो, परंतु, असलेलं न दिसणं हीदेखील ‘माया’ नव्हे का? अनेकदा उघड असलेली गोष्ट आपल्याला दिसत नाही. डोळ्यासमोर ठाण मांडून असली तरी दिसत नाही. ही केवळ गंमत नव्हे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ग्रीनव्हिल नावाच्या पाणबुडीने ‘इमर्जन्सी डीप’ (अचानक उसळून वर येणे) समुद्रातल्या तिच्या डोक्यावर असलेल्या एहिम मारू नावाच्या २०० फूट लांब जपानी बोटीला उभं चिरलं!! पेरिस्कोपमध्ये दिसणारी तरंगती बोट निष्णात कॅप्टनला दिसत असून दिसली नाही!!
मित्रा, मानसशास्त्रातले प्रयोग भौतिकशास्त्राइतकेच चक्रावून टाकतात. मानसशास्त्र हे विज्ञानच नव्हे असं म्हणणाऱ्यांची ऐशी तैशी करत..यूटय़ूबवर इनव्हिजिबल गोरिला शोधून एकदा तू स्वत:च आजमाहून पाहा..
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com