पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अद्याप सुधारित मतदार याद्या देण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे सध्या असलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गोंधळ आहे. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या याद्याही अद्याप तयार नाहीत, अशी तक्रार निवडणुकीतील जनता दलाचे (सेक्युलर) उमेदवार शरद पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २० जून रोजी होणार आहे. निवडणुकीच्या मतदार याद्यांबाबत पाटील म्हणाले, की अंतिम यादी १० जूनला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या असलेल्या याद्यांमध्ये एक लाखांहून अधिक नावे दुबार आहेत. अनेकांच्या पत्त्यांमध्येही घोळ आहेत. यापूर्वी सुटीच्या दिवशी मतदान ठेवण्यात येत होते. मात्र, यंदा पहिल्यांदाच शुक्रवारी म्हणजेच कामाच्या दिवशी मतदान ठेवण्यात आले आहे. मतदार या दिवशी कामावर उपस्थित राहतील. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावी, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मोदी फॅक्टरबाबत ते म्हणाले, की मोदींची लाट लोकसभेत चालली. मात्र, या निवडणुकीत फरक आहे. त्यामुळे कोणत्याही हवेचा परिणाम होणार नाही. पदवीधरांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आपण ही निवडणूक जिंकणार आहोत.