पिंपरी पालिका म्हणजे श्रीमंत महापालिका, उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथले ‘कारभारी’. त्यामुळे राष्ट्रवादीचा एखादा विषय मंजूर होण्यात इथे अडचण येत नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, खुद्द आर. आर. आबांच्या गृहखात्याला, अर्थात पोलिसांना  आर्थिक मदत देण्यास अजितदादांच्या पिंपरीतील शिलेदारांनी ‘ठेंगा’ दाखवला आहे. ऊठसूट ही मंडळी आमच्याकडे कशाच्या आधारावर पैसे मागतात, हे आबांना विचारा, अशी सूचना करण्यात आल्याने पिंपरी पालिकेकडून पोलिसांना सातत्याने होणाऱ्या आर्थिक रसदीचा विषयही ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाच्या संगणक प्रणालीसाठी १६ लाख ११ हजार व पुढील प्रत्येक वर्षांसाठी साडेतीन लाख रुपये देण्याची मागणी पुणे पोलिसांनी पिंपरी पालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली होती, त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी सभेसमोर ठेवला असता सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला. आर. आर. आबांना सांगा, तुमचे लोक ऊठसूट पैसे मागतात आणि कशाच्या आधारे पैसे मागतात, असा मुद्दा शमीम पठाण यांनी उपस्थित केला. आतापर्यंत पोलिसांच्या अनेक कामांना पिंपरी पालिकेने आर्थिक मदत केली, त्याचा हिशेब कधीच मिळत नाही. त्यांचे प्रस्ताव येतात, मात्र ते स्वत: कधी नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना तरी भेटतात का, त्यांनी पत्रं द्यायची आणि आपण ते विषय मंजूर करायचे, असेच आतापर्यंत चालत आले आहे, मात्र यापुढे तसे करता येणार नाही. जकात रद्द झाली, एलबीटीचे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. पैशाचा तुटवडा असल्याने खर्च वाढवणारे विषय आणू नयेत, असे त्या म्हणाल्या. पठाण यांच्या सुरात सूर मिळवत अन्य सदस्यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली. अखेर, हा विषय फेटाळून लावण्याची मागणी सभेत झाली, त्यानुसार, हा प्रस्ताव महापौरांनी फेटाळला.