कोणत्याही कागदपत्रांशिवाय आठशे रुपयांमध्ये आधारकार्ड तर सहाशे रुपयांमध्ये पॅनकार्ड काढून देण्याचा दावा करणाऱ्या महिलेविरोधात मंगळवारी सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वंदना अशोक दुधे असे या महिलेचे नाव आहे.
ज्ञानेश्वरनगरामध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधारकार्ड बनवून देण्याचा दावा करणारी महिला राहत असल्याची  माहिती परिसरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार या परिसरातील कार्यकर्त्यांनी या महिलेकडे जाऊन आधारकार्ड आणि पॅनकार्डचे दर विचारले. त्यावर कोणत्याही कागदपत्राशिवाय केवळ ८०० रुपयामध्ये आधारकार्ड तर ६०० रुपयात पॅनकार्ड बनवून देण्याचा दावा वंदना दुधे यांनी केला. त्यावर कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता बोगस कार्ड बनवत असल्याचे कबूल करत या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी दुधे यांच्या दुकानात पाहणी केली असता तिथे अशाच प्रकारे आधारकार्ड साठी भरलेले अर्ज, आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडले. त्यांनी दुधे यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून वागळे इस्टेट पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. हे अर्ज हरिष नावाच्या व्यक्तीला देत होती आणि तोच हे कार्ड बनवून देत असल्याचे माहिती दुधे यांनी पोलिसांना दिली आहे.