* नगरसेवक भोईर कुटुंबीय शिवसेनेत दाखल * वर्षभरापासूनच्या चर्चेला विराम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्या कट्टर समर्थकांमध्ये गणले जाणारे पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर आणि उषा भोईर यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. बाळकुम, ढोकाळी भागांत वर्चस्व असलेल्या भोईर कुटुंबीयांच्या सेनेतील प्रवेशाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. मात्र, स्थानिक शिवसैनिकांचा विरोध आणि पदासंबंधीची बोलणी यामुळे हे पक्षांतर लांबणीवर पडले होते. माजिवडा भागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनीही सेनेत प्रवेश केला आहे.

महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीपासून शिवसेना आणि भाजपमध्ये परपक्षांतील नाराजांना गळाला लावण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. कळवा-मुंब्रा परिसरांतील काही अपवाद वगळले तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील ठाणे शहर परिसरातील नगरसेवकांना जाळ्यात ओढत निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती केली जात असून या रणनीतीचा भाग म्हणून सोमवारी राष्ट्रवादीच्या आणखी तिघा नगरसेवकांना मातोश्रीवर हजर करत शिवसेनेने घोडबंदर भागात ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला.

देवराम भोईर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय भोईर आणि त्यांच्या नगरसेविका पत्नी उषा या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांच्या एके काळचे निष्ठावंत समजले जातात. वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत देवराम यांच्याविरोधात उमेदवार मागे घेत शिवसेनेने त्यांना बिनविरोध निवडीसाठी मदत केली होती. तेव्हाच भोईर कुटुंबीय भगवा खांद्यावर घेणार, अशी चर्चा रंगली होती. या दरम्यान झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मात्र भोईर कुटुंबीय वसंत डावखरे यांच्यासोबत निष्ठेने वावरताना दिसले. सोमवारी या तिघांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादीसह डावखरे यांनाही मोठा धक्का दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. गेल्या चार महिन्यांत राष्ट्रवादीतील डावखरे समर्थक नगरसेवक सातत्याने शिवसेना-भाजपच्या गळाला लागत आहेत. कोपरीतील भरत चव्हाण, लक्ष्मण टिकमानी, घोडबंदर भागातील मनोहर डुंबरे, वागळे परिसरातील योगेश जानकर असे डावखरे समर्थक नगरसेवक यापूर्वीच शिवसेना-भाजपमध्ये गेले आहेत.

दरम्यान, भोईर कुटुंबीयांचा शिवसेनाप्रवेश पक्का होत असल्याचे लक्षात आल्याने गेल्या बुधवारी याच भागातील शिवसेना नगरसेविका शारदा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारीही भाजपवासी झाले असून युती झाली नाही तर या पट्टय़ात शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

आव्हाडांवर अप्रत्यक्ष निशाणा

ठाण्यातील राष्ट्रवादी म्हणजे एका नेत्याची जहागीर झाली असून येथे लोकशाही व्यवस्था संपुष्टात आल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया संजय भोईर यांनी दिली. ‘‘पक्षाने विरोधी पक्षनेतेपदी निवड करूनही मला काम करू दिले जात नव्हते. एक नेता सांगेल तसेच वागायचे ही पद्धत रूढ झाली होती,’’ असे सांगत भोईर यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.