आठ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी; महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रदर्शन
येथील ‘इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ’ या संस्थेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून या अर्धशतकी वाटचालीच्या टप्प्यावर महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अलीकडेच शहरातील रोटरी सभागृहात झालेल्या समारंभात रूपा देसाई-जगताप यांच्याकडे क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली. या वेळी येत्या वर्षभरात शहरातील गरजू मुलींचे शिक्षण, तसेच छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या महिलांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याची घोषणा त्यांनी केली.
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा मुलींच्या शिक्षणाकडे पालक दुर्लक्ष करतात. हुशार असूनही मुलींच्या शिक्षणाचा हक्क नाकारला जातो. शहरातील विविध शाळांमधील अशा मुलींचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी ‘दत्तक पालक योजना’ इनरव्हीलतर्फे राबविण्यात येत आहे. भगिनी मंडळ शाळेच्या पाच तसेच इंजल्स ड्रीम शाळेच्या तीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.
या आठ मुलींच्या तीन वर्षांचे वार्षिक शैक्षणिक शुल्कसंबंधित देणगीदार देणार आहेत. याशिवाय भगिनी मंडळ शाळेला संस्थेने ई-लर्निग प्रकल्प दिला आहे.
शहरात कार्यरत असलेल्या महिला बचत गटांचे सर्वेक्षण करून त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी क्लबतर्फे डिसेंबर-जानेवारी महिन्यात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.