घरात एखादा धार्मिक विधी करायचा म्हटला की तरुणांच्या कपाळावर आठय़ा दिसतात. हा विधी करायचा की नाही इथपासून ते वडील मंडळी सांगतात म्हणून तो करायचाच झाला तर त्याची तयारी कोण करणार, गुरुजी कोठे शोधायचे असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतात. तरुणाईच्या वेळेची चिंता लक्षात घेऊन मृदुला बर्वे आणि शेखर मलिक या दोघांनी पौरोहित्य सेवा पुरविणाऱ्या http://www.opandit.com या व्यवसायास सुरुवात केली.
संगणक विज्ञान शाखेतील पदवीधर मृदुला इतर कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणेच घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणारी. याच काळात तिचे हिंदू पंजाबी असलेल्या मलिक कुंटुबातील शेखरशी विवाह झाला. शेखर वित्त क्षेत्रात एमबीए पदवीधर असल्याने तोही कॉर्पोरेट वेळांमध्ये जखडलेला. एका सुट्टीच्या दिवशी स्वत:साठी वेळ देताना कुटुंबातील वडील माणसांच्या अनेक इच्छा पुरविण्याची जबाबदारी इतरांप्रमाणे त्यांच्यावरही होती. मग अगदी सत्यनारायणाची पूजा करायची असली तरी ती करण्यापूर्वी सुट्टीचा दिवस पाहायचा, त्याच दिवसात सगळी तयारी करायची, गुरुजी शोधायचे असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहायचे. हीच समस्या आपल्या वयाच्या नोकरी करणाऱ्या इतरांनाही जाणवत असेल असा विचार मृदुलाच्या मनात आला आणि दोघांनी यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून विचार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान बाळंतपणासाठी पुरेशी रजा न मिळाल्याने मृदुलाने नोकरी सोडली आणि तेव्हा स्वत:चे काहीतरी करायचे ही लहानपणापासूनची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मृदुलाने पौरोहित्य कसे केले जाते त्याचे धार्मिक आधार काय याबाबत वाचन करण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या भेटी घेऊन वेगवेगळ्या समाजातील विधींची माहिती करून घेतली. यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून मृदुलाने ओ पंडितची स्थापना केली.
ओ पंडित ही केवळ ग्राहक आणि गुरुजी यांना एकमेकांची माहिती उपलब्ध करून देणारे संकेतस्थळ नसून धार्मिक विधींसाठी आवश्यक त्या संपूर्ण सेवा पुरविणारी कंपनी म्हणून ओळखली जावी अशी मृदुलाची इच्छा होती. यामुळे त्यादृष्टीने कंपनीच्या सेवांची रचना करण्यात आली.
या संकेतस्थळावर विविध प्रकारच्या धार्मिक विधींचा तपशील देण्यात आला आहे. यातील कोणता धार्मिक विधी करायचा आहे तो पर्याय निवडून ग्राहक तेथे दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधू शकतो. हा संपर्क होतो तेव्हा ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याच्याकडून प्राथमिक माहिती मिळवली जाते. विधीच्या दिवशी कंपनीतर्फे केवळ गुरुजीच नव्हे तर पूजेचे साहित्यही पुरविले जाते.
याचबरोबर ज्या दिवशी धार्मिक विधी करावयाचा आहे त्या दिवशी ग्राहकाच्या घरी कंपनीचा माणूसही पोहोचतो. ती व्यक्ती त्यांच्या घरात पूजेसाठी आवश्यक असलेली तयारी करते. अगदी शहनाई लावून वातावरण मंगलमय केले जाते. याचबरोबर विधी पूर्ण झाल्यानंतर पूजेची आवराआवर करून घर जसे होते तसे ग्राहकाकडे सोपविले जात असल्याचे मृदुलाने स्पष्ट केले. यामुळे ग्राहकाने एकदा पूजेची नोंदणी केली की त्याला त्या पूजेची तयारी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ द्यावा लागत नाही.
गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत
या कंपनीची स्थापना स्वत:कडे असलेल्या निधीतून करण्यात आली. भविष्यात निधी उभारण्यासाठी गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागणार असल्याचेही मृदुलाने नमूद केले. कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी ग्राहकांना जे पैसे आकारले जातात तोच कंपनीचा मुख्य उत्पन्नस्रोत आहे.
भविष्यातील वाटचाल
सध्या ही सेवा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत उपलब्ध आहे. भविष्यात ती देशातील इतर शहरांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरविण्याचा मानस असल्याचे मृदुलाने स्पष्ट केले.
नवउद्योग सुरू करताना समाजात नेमकी कशाची गरज आहे हे लक्षात घ्या. नसलेली गरज निर्माण करू नका. समाजातील जी गरज आपण भागवणार आहोत ती कशी भागवणार याचा विचार केला. त्याचा पूर्ण अभ्यास करा, घाईने निर्णय घेऊ नका. तसेच आपण जेव्हा नवउद्योग सुरू करतो तेव्हा किमान दोन वष्रे तरी आपल्याला नफा होणार नाही हा विचार करून मगच पुढचे पाऊल टाकावे.
नीरज पंडित
@nirajcpandit