प्रत्येक गावाबाहेर स्वागताची एक पाटी किंवा फलक असतो. ‘अमुक-तमुक गावात आपलं सहर्ष स्वागत,’ असा फलक प्रत्येक गावाबाहेर लावलेला असतो. हरयाणातील एका गावाबाहेरदेखील असा फलक लागला आहे. मात्र हा फलक काही साधासुधा नाही. त्यामुळेच या फलकावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पडते आहे. प्रत्येकजण या स्वागताच्या फलकाकडे पाहून वारंवार त्यावरील मजकुराकडे पाहतो आहे. कारण या फलकावर ‘ट्रम्प गावात तुमचे स्वागत’, असे लिहिण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एका गावालाच चक्क ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे.

हरयाणातील मरोरा गावात प्रवेश करताना ‘ट्रम्प गावात तुमचे स्वागत’, असे हिंदी आणि इंग्रजी लिहिले आहे. ट्रम्प गावातील अनेक घरे विटांची आहेत आणि गावाचे नामकरण साजरे करण्यासाठी संपूर्ण गावात झेंडूंच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. गावाच्या सरपंचांनी आणि सुलभ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने गावाचे नामकरण ‘ट्रम्प’ असे केले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर जरी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागताचे फलक लावलेले असले, तरी या नामकरणाला सरकारने मान्यता दिलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक संदेश म्हणून हरयाणातील गावाला ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. सुलभ या स्वयंसेवी संस्थेने या नामकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिका दौऱ्यादरम्यान नामकरणाची कल्पना सुचल्याने सुलभचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी सांगितले. ‘अमेरिकेत बोलत असताना ट्रम्प यांचे नाव एखाद्या गावाला का दिले जाऊ नये?, असा विचार मनात आला होता. आसपासच्या गावांचे नुकतेच नामकरण करण्यात आले असल्याने ही कल्पना सुचली,’ असे पाठक यांनी सांगितले.