प्रशस्त रस्ते असतानाही नियोजनाअभावी वाहतुकीचे ‘तीन तेरा’

मुंबईत रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अनेकांना जाग आली. रस्त्यावरील अतिक्रमणे आणि पथारीवाल्यांचे रहदारीला होणारे अडथळे यासारखे मुद्दे ऐरणीवर आले. प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात झाली. आंदोलने सुरू झाल्यानंतर गर्दीच्या चौकांनी मोकळा श्वास घेतला. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहतुकीचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. वाहनस्वारांची बेशिस्ती, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, हप्तेगिरी, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, यामुळे रस्त्यांवरील विशेषत: सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे डोळेझाक होते आहे. जवळपास सर्वच भागातील पदपथ गायब झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते, त्याचे कोणालाही सोयर-सुतक नाही. एखादी दुर्घटना झाल्यानंतरच आपले डोळे उघडणार आहेत का?

प्रशस्त रस्ते ही पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख आहे. कोटय़वधी रूपये खर्च करून पिंपरी महापालिकेने भले मोठे रस्ते तयार केले. त्यामुळे सुरळीत व वेगवान वाहतूक होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि पथारीवाल्यांचा स्वैर संचार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरातील वाहतुकीचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसला असल्याने नागरिकांच्या जिवावर बेतण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसारखी दुर्घटना घडण्याचीच आपण वाट पाहतो आहोत आणि तसे झाल्याशिवाय आपले डोळे उघडणारच नाहीत का?

केंद्रीय रस्ते व वाहूतकमंत्री नितीन गडकरी गेल्या महिन्यात सीआयआरटीच्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन गेले. रस्ते, वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता या विषयावर ते भरभरून बोलले. पिंपरी-चिंचवडशी संबंधित वाहतुकीच्या मुद्दय़ांवरही त्यांनी सूचक भाष्य केले. त्यातून कोणी काही बोध घेतला, असे वाटत नाही. वाहतूक कोंडीच्या मुद्दय़ावर फक्त पुण्याच्या नावाने खडे फोडण्यात अर्थ नाही. पिंपरी-चिंचवडची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. पुण्याच्या तुलनेत पिंपरीत मोठे रस्ते असूनही त्याचा उपयोग वाहतुकीऐवजी अन्य कामांसाठीच होतो. एखादा अपवाद वगळता पिंपरी-चिंचवडला वाहतूक कोंडीची अडचण नाही, असे आतापर्यंत मानले जात होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून वाहतूक समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत नाही असा शहरातील एकही भाग नसेल. महापालिकेच्या मालकीचे रस्ते, भूखंड यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. पदपथांवर दुकाने थाटली आहेत. पथारीवाले मनमानी करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. अतिक्रमण विभाग नावाला राहिला आहे. वाहतूक पोलीसही तोच कित्ता गिरवत आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षावाल्यांची मनमानी सुरू असते. शहरात जागोजागी वाहतूक नियम पायदळी तुडवले जात असतानाही पोलीस काही करू शकत नाहीत. हप्त्यांची सोय झाली असल्याने अशा गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. काही ठिकाणी स्थानिक मंडळी हातगाडी, पथारीवाल्यांकडून सक्तीने भाडे वसूल करतात.

पिंपरी कॅम्प, पिंपरी चौक, रेल्वे स्टेशन परिसर, चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव रस्ता, मोरवाडी सिग्नल ते बॉम्बे सिलेक्शानपर्यंतचा रस्ता, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, थेरगाव तसेच हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते, पिंपरी ते खराळवाडी रस्ता, नेहरूनगर रस्ता, भोसरी उड्डाणपुलाखालील परिसर, भोसरी-आळंदी रस्ता, तळवडे, निगडी, आकुर्डी, मासूळकर कॉलनी, संभाजीनगर ते चिखली, मोशी, वाकड, रहाटणी, काळेवाडी, सांगवी, स्पायसर रस्ता, तसेच दापोडी, कासारवाडी, डेअरी फार्म येथील रेल्वे गेट परिसर अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे दररोज वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. अंतर्गत भागातही तशीच अवस्था आहे. ‘आयटी हब’ हिंजवडीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था भीषण आहे. भोसरीत उड्डाणपूल बांधल्यानंतरही वाहतुकीचा खोळंबा कायम आहे. मोरवाडीचा सिग्नल ते चिंचवड स्टेशनचा सिग्नल या रस्त्यावर कशीही वाहने लावलेली असतात. निगडीचा सिग्नल, चिंचवडच्या नाटय़गृह चौकात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठय़ा बस रस्ता अडवून थांबलेल्या असतात. काळेवाडी फाटा ते डांगे चौकापर्यंतच्या रस्त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण, पथारीवाले, हातगाडीवाले, छोटे-मोठे विक्रेते यांनी रस्ता व्यापून टाकला आहे. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागतात. कासारवाडी व पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे फाटकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून आहे. उड्डाणपूल झाल्यानंतरही कासारवाडीतील मूळ समस्या कायम आहे. पिंपरी बाजारपेठेत कोणत्याच प्रकारची नियमावली अस्तिवात नाही. वाहतुकीच्या रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण आहे. थेट रस्त्यावरच दुकाने थाटण्यात आली आहेत. कारवाई करण्याची धमक महापालिका यंत्रणेत नाही. वाहतूक पोलीसही कारवाई करण्याच्या फंदात पडत नाहीत. ‘हप्तेगिरी’ हे त्याचे मूळ दुखणे आहे.

‘कार डेकोरेटर्स’ आणि मंगल कार्यालयांचा बंदोबस्त करा

पिंपरी-चिंचवड शहरात ‘कार डेकोरेटर्स’ मंडळींनी रस्ते गिळंकृत करण्याचा सपाटाच लावला आहे. पिंपरी, खराळवाडी, कासारवाडी, शंकरवाडी भागात त्यांचा उपद्रव ठळकपणे दिसून येतो. शासकीय यंत्रणेकडून त्यांना पूर्णपणे अभय आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेले सेवा रस्ते या मंडळींनी गायब केल्याने हमरस्त्यावर दररोज कोंडी होते. महापालिका अधिकारी, पोलिसांची उघड हप्तेगिरी आहे. मंगल कार्यालये, सभागृहांच्या बाबतही तोच प्रकार आहे. पिंपरी, रहाटणी, काळेवाडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, हिंजवडी, निगडी, भोसरी, चऱ्होली आदी ठिकाणी असलेली मंगल कार्यालये नागरिकांचा मनस्ताप वाढविणारी ठरली आहेत. गर्दीच्याच वेळेत वाहतुकीचा खोळंबा करून ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून वऱ्हाडी मंडळी नाचगाण्याचा आनंद लुटत असतात. आपल्यामुळे नागरिकांना त्रास होतो आहे, याचे भान त्यांना नसते. त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे.