किरण फाटक लिखित ‘संगीताचे शैक्षणिक मानसशास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे डॉ. शिल्पा बहुलेकर यांच्या हस्ते झाले. श्रोते आणि कलाकार यांची मानसिकता एक झाल्याशिवाय कलाकार आपली कला श्रोत्यांपर्यंत पोहचवू शकत नाही, असे प्रतिपादन डॉ. बहुलेकर यांनी या वेळी बोलताना केले. गायक पं. विश्वनाथ कशाळकर म्हणाले की, फाटक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत शिक्षण क्षेत्रातील मानसिकतेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.  डॉ. सुधाताई पटवर्धन यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी किरण फाटक यांचे सुश्राव्य गायन झाले. प्रिया पागे यांनी सूत्रसंचालन केले.

‘घातचक्र’ कथासंग्रहाचे प्रकाशन
माजी अतिरिक्त  पोलीस अधिक्षक रोहिदास दुसार यांनी लिहिलेल्या ‘घातचक्र’ या गुन्हेगारी विषयक कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच एका कार्यक्रमात डॉ. रोहिदास वाघमारे यांच्या हस्ते झाले. संवेदना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याच कार्यक्रमात दुसार यांनी लिहिलेल्या ‘पोलिसांचा मानबिंदू चार्ल्स फोर्जेट’ या पुस्तकाचे प्रकाशनही धनराज वंजारी यांच्या हस्ते झाले. दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार, पोलीस अधिकारी अशोक टाकळकर, नंदकुमार मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोहन कान्हेरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आता तरी जागे व्हा
व्याख्याते आणि प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे लिखित ‘आता तरी जागे व्हा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मालाड येथे ‘भाजप’चे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले. येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वोत्तम व्याख्यानमालेत  शेवडे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी भातखळकर यांच्यासह शेवडे आणि गिरीश दाबके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.