पामबीच रोडवरील सारसोळे गावालगतच्या नाल्याजवळ ४ जानेवारी रोजी एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत जाळालेला मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेच्या मारेकऱ्याला २१ दिवसांच्या आत गजाआड करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. आरोपीचे नाव शहीद अली कुरेशी असून सदर महिलेचा पती आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नी नगमाबानू कुरेशी हिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 

नगमाबानू कुरेशी व शहीद अली कुरेशी या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. नगमाबानूचे अवेळी घरातून बाहेर जाणे, उडवाउडवीची उत्तरे देणे यामुळे शहीदला तिच्या चरित्र्यांचा संशय येत होता. यातच शहीद क्राईम पेट्रोलसारख्या मालिका बघत असल्याने त्याने नगमाबानूला ठार मारण्याचा कट रचला. वाशी येथील ब्रिजखाली पत्नी नगमाबानू करेशी ही शहीद अलीला फिरताना दिसली. तिथे दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर शहीद तिला घेऊन पाचबीच रोडवरील सारसोळे गावालगतच्या नाल्यालगत आला. तेथे त्याने तिचा गळा चिरून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये याकरिता तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून चेहरा जाळून टाकला. तसेच स्वत:च देवनार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीची मिसिंगची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर शहीद अली कुरेशी हा उत्तर प्रदेश येथे आपल्या पहिल्या पत्नीकडे निघून गेला होता.
दरम्यान नवी मुंबई पोलिसांना पामबीचजवळ एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला होता. सदर महिलेची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे येथील पोलीस ठाण्यांकडून माहिती मागितली होती. त्यावरून देवनार पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार नोंद असल्याचे कळल्याने सदर महिलेच्या नातेवाईकास बोलावून ओळख पटवून घेतली. पण सदर महिलेचा पती शहीद अली कुरेशी याने खोटी तक्रार केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आरोपी शहीद अलीचा शोध घेण्याकरिता उत्तर प्रदेशकडे गेले. पण तो गुजरात मार्गे मुंबईकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्याुनसार सापळा रचून भोईसर येथे शहीदला अटक केली. २ फेब्रुवारीपर्यंत शहीदला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.