Maharashtra Local Body Elections 2025 / बुलढाणा : मागील तब्बल चार वर्षांपासून मनमानी पद्धतीने कारभार चालणाऱ्या नगर पालिकातील ‘प्रशासक राज’ अखेर संपणार आहे. ३ डिसेंबर रोजी नगरपालिकाना आणि मतदारांना आपले हक्काचे नगरसेवक मिळणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला. घोषित कार्यक्रमनुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मत मोजणी अंती निकाल जाहीर होणार आहे. या परिणामी पालिकातील प्रशासक राज ३ डिसेंबर रोजी संपूष्टात येणार आहे.
जिल्ह्यातील अकरा पैकी ९ पालिकाची मुदत मागील डिसेंबर २०२१ संपली होती. यामध्ये बुलढाणा, चिखली, मलकापूर, शेगाव, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा या पालिकाचा समावेश होता. त्यापाठोपाठ लोणार व सिंदखेड राजा या पालिकाची मुदत संपली. त्यामुळे या पालिकात प्रशासक राज लागू झाला. दीर्घ काळ असलेली ही प्रशासकीय राजवट आता पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे.
आज सोमवारी, ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील ( कधीचीच) मुदत संपलेल्या नगरपालिका व नगर पंचायत चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरील ११ पालिकाचा समावेश आहे. संग्रामपूर व मोताळा नगर पंचायत ची मुदत संपायला अजून सव्वा दोन वर्षांचा कालावधी आहे. यामुळे बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, देऊळगाव राजा, मेहकर या पालिका मधील रण संग्राम चालू महिन्यात रंगणार आहे. अध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून काट्याची लढत होणार असून २८६ नगरसेवक पदासाठी चुरशीच्या लढती रंगणार आहे.
१० पासून नामांकन
आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार २ डिसेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशीच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. १० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.
१७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. १८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जची छाननी होईल. २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येईल. २६ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल.२ डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
