‘रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार’ समारंभात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

खरी पत्रकारिता ही देशाला बळकट करते. पत्रकारिता जितकी समर्थ होत जाईल, तितकी लोकशाहीलाच झळाळी येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी १३व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पुरस्कारांच्या वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने केले.

देशभरातील वृत्तपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि वेगाने वाढत असलेली डिजिटल माध्यमे; यात भरीव कामगिरी करीत असलेल्या पत्रकारांचा गौरव करणारा हा देशातला एकमेव प्रतिष्ठित आणि मानाचा पुरस्कार आहे. या समारंभात विविध माध्यमांमध्ये २०१७ साली सर्वोत्तम कामगिरी केलेल्या २९ पत्रकारांना गौरविण्यात आले. ‘लोकसत्ता’चे उपसहयोगी संपादक संदीप आचार्य आणि सहाय्यक संपादक निशांत सरवणकर यांचाही शोधपत्रकारितेसाठी प्रादेशिक भाषिक वृत्तपत्र वृत्तांकन विभागात या पुरस्काराने गौरव झाला.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, पत्रकारिता ही लोकशाहीची नुसती पहारेकरी नाही, तर तिची मोजपट्टीही आहे. पत्रकारिता ही देशभक्ती आणि निर्भयतेचा आधार आहे. जी पत्रकारिता देशविरोधी असते किंवा भ्रष्टाचारावर पांघरूण घालते ती पत्रकारिताच नव्हे! मी कधी कधी वाचतो की, ‘नक्षलवादी हे हाती बंदूक घेतलेले गांधीवादी आहेत!’ पण   बंदूक आणि गांधी एकत्र नांदतील, याची मी कल्पनाही करू शकत नाही. जे निरपराध नागरिकांचा बळी घेतात त्यांच्या मानवी हक्कांची चर्चा होते, मग त्या दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानाच्या मानवी हक्काचे काय, असा सवालही त्यांनी केला.

वृत्तपत्रांनी सरकारशी जवळीक निर्माण करावी, असे मी म्हणत नाही. या दोघांमध्ये मैत्री नसावी, तसेच वैरही असू नये, असेही राजनाथ यांनी सांगितले. पारंपरिक वृत्तमाध्यमांसमोर सध्या समाज माध्यमांचे, बोगस बातम्यांचे आणि अतिरंजित बातम्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र जोवर विश्वासार्हता जपली जाईल तोवर पारंपरिक माध्यमांचे महत्त्व अबाधितच राहील, असेही राजनाथ म्हणाले.

वृत्त आणि मत यांची भेसळ होता कामा नये, असे स्पष्ट करीत राजनाथ म्हणाले की, मताच्या मांडणीसाठी वृत्तपत्रात स्वतंत्र जागा असावी. माध्यमांनी आरशासारखी भूमिका पार पाडावी, पण तो आरसा कोणत्याही रंगाने रंगविलेला नसावा.

‘एक्स्प्रेस वृत्तसमूहा’चे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी प्रास्ताविकात सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, ‘‘जातिवंत पत्रकारासाठी उत्तम पत्रकारिता हाच खरा पुरस्कार आहे. कंठाळी वाहिन्या आणि समाज माध्यमांतील अतिरेकी अग्रेषित अगोचरपणा यापलीकडे दृष्टी टाकली तर आजही उत्तम पत्रकारिता पाय रोवून उभी आहे, हे दिसेल.’’ समारंभाच्या अखेरीस ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक राज कमल झा यांनी आभारप्रदर्शन केले.

यावर्षी ‘मी टू’ ही लैंगिक शोषणाविरोधातील चळवळ भारतीय माध्यमांतील बातम्या आणि लेखांच्या केंद्रस्थानी आली आहे. वृत्तसृष्टीतील महिलांनीही प्रथमच व्यक्त होत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती आणि त्यामुळे एका केंद्रीय मंत्र्यावर पदत्यागाची वेळ आली. त्यामुळे ही चळवळ समजून घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी संपादकांची काय जबाबदारी आहे, याबाबत दिशादर्शन करण्यासाठी या समारंभात पुरस्कार वितरणानंतर ‘मी टू इन द न्यूजरूम : व्हॉट एडिटर्स कॅन अ‍ॅण्ड शुड डू’ हा परिसंवाद झाला.

रामनाथ गोएंका पुरस्कार विजेते

शोध वार्ताकन

मुद्रित – विजयकुमार एस. – द हिंदू

दृक्श्राव्य – आनंद कुमार पटेल – इंडिया टूडे टीव्ही

राजकीय वार्ताकन

मुद्रित – सुशांत कुमार सिंग – द इंडियन एक्स्प्रेस

दृक्श्राव्य – ब्रजेश राजपूत, एबीपी न्यूज

हिंदी

मुद्रित – अमित कुमार सिंग – द वायरडॉटइन

दृक्श्राव्य – अभिसार शर्मा, एबीपी न्यूज

थेट वार्ताकन

मुद्रित – मृदुला चारी – स्क्रोलडॉटइन

दृक्श्राव्य – जगविंदर पटियाल – एबीपी न्यूज

पुस्तके कथाबाह्य़ (नॉन फिक्शन)

मीलन वैश्णव – व्हेन क्राइम पेज : मनी अँड मसल इन इंडियन पॉलिटिक्स मुद्रित २०१७

* जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातून वार्ताकन

नम्रता बिजी अहुजा – द विक

रिकिंती मर्विन – हायलँड पोस्ट

* हिंदी

अमित कुमार सिंग – दवायरडॉटइन

* प्रादेशिक भाषा

सदीप अशोक आचार्य, निशांत दत्ताराम सरवणकर – लोकसत्ता

* पर्यावरणविषयक वार्ताकन

संध्या रवीशंकर – दवायरडॉटइन

* दुर्लक्षित भारताबाबत वार्ताकन

पार्थ मीना निखिल – रुरलइंडियाऑनलाइनडॉटओआरजी

* वाणीज्य आणि अर्थ वार्ताकन

टीम रॉयटर्स, थॉमसन रॉयटर्स

* राजकीय वार्ताकन

मुद्रित – सुशांत कुमार सिंग – द इंडियन एक्स्प्रेस

* क्रीडा पत्रकारिता

नितिन शर्मा – द इंडियन एक्स्प्रेस

दक्ष पनवार – द इंडियन एक्स्प्रेस

* थेट वार्ताकन 

मृदुला चारी – स्क्रोलडॉटइन

* शोध वार्ताकन

मुद्रित – विजयकुमार एस. – द हिंदू

* वृत्तलेख लेखन

दीपंकर घोष – द इंडियन एक्स्प्रेस

* भारतात वार्ताकन करणारे परदेशी वार्ताहर

अ‍ॅनी गोवेन – द वॉशिंग्टन पोस्ट

* भाष्य आणि विश्लेषणात्मक लेखन

गुलाब कोठारी – राजस्थान पत्रिका

* नागरी पत्रकारिता

शालिनी नायर – द इंडियन एक्स्प्रेस

* छायाचित्र पत्रकारिता

ताशी तोबग्याल – द इंडियन एक्स्प्रेस

* पुस्तके नॉन फिक्शन

मीलन वैष्णव – व्हेन क्राइम पेज : मनी अँड मसल इन इंडियन पॉलिटिक्स दृक्श्राव्य २०१७

* जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातून वार्ताकन

जफर इकबाल – एनडीटीव्ही इंडिया

* हिंदी

अभिसार शर्मा, एबीपी न्यूज

* प्रादेशिक भाषा

एम. गुणसेकरन – न्यूज १८ तामिळनाडू

* पर्यावरणविषयक वार्ताकन

सुशीलचंद्र बहुगुणा – एनडीटीव्ही इंडिया

* दुर्लक्षित भारताबाबत वार्ताकन

प्रतिमा मिश्रा – एबीपी न्यूज

* आर्थिक पत्रकारिता

सुशीलकुमार मोहापात्रा – एनडीटीव्ही इंडिया

* राजकीय वार्ताकन

दृक्श्राव्य – ब्रजेश राजपूत, एबीपी न्यूज

* क्रीडा पत्रकारिता

मौमिता सेन – इंडिया टूडे टीव्ही

* थेट वार्ताकन

जगविंदर पटियाल – एबीपी न्यूज

* शोध वार्ताकन

आनंद कुमार पटेल – इंडिया टूडे टीव्ही अंतर्गत पुरस्कार

* उत्कृष्ट वार्ताकनासाठीचा संजीव सिन्हा स्मृती पुरस्कार 

आंचल मॅगझिन – द इंडियन एक्स्प्रेस

* उत्कृष्ट संपादनासाठीचा प्रिया चंद्रशेखर स्मृती पुरस्कार

राम सारंगन – द इंडियन एक्स्प्रेस