पुणे : महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे तसेच खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसराचा समावेश करण्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली. या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द १.६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने वाढणार आहे. राज्य सरकारकडून हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असून, केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकार याची अधिसूचना काढणार आहे.
महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे आणि खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पिपंरी चिंचड महापालिकेेचे आयुक्त शेखर सिंह तसेच पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या उपस्थित होते. दिल्लीवरून ऑनलाइन बैठकीत संरक्षण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत करण्यासंदर्भात गेल्या चार ते पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला या संदर्भात कँन्टोन्मेंट प्रशासनासमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात बैठक घेऊन लोकसंख्या, मिळकती, कर्मचारी, त्यांचे वेतन, निवृत्तिवेतन यांसह आर्थिक बाबींवर चर्चा केली होती. राज्य सरकारकडून यासंदर्भात केंद्र सरकार व संरक्षण विभागासमवेत यासंदर्भात चर्चा सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कँन्टोन्मेंट विलीनीकरणाबाबत आढावा घेण्यात आला होता. या दोन्ही बोर्डांच्या विलीनीकरणासाठी आमदार सुनिल कांबळे यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेऊन दोन्ही कँन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महापालिकेत करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली.