‘सीएनजी’चा शोध

स्वत:च्या गाडीने प्रवासावर निघाल्यानंतर जाणवणारी एक अडचण म्हणजे इंधनाचा शोध. काही कारणाने गाडीत इंधन पूर्णपणे भरलेले नसल्यास प्रवासात पेट्रोलपंप शोधत हिंडावे लागते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात पेट्रोलपंप मोठय़ा प्रमाणावर उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यासाठी फार शोधाशोध करावी लागत नाही. परंतु, गॅसवर चालणाऱ्या गाडय़ांसाठी सीएनजी पंपाचा शोध घेणे हे महाकठीण काम आहे. अगदी मुंबई, नवी मुंबईतही सीएनजी पंपिंग स्टेशन शोधताना वाहनचालकांची दमछाक होते. प्रत्येक वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यास किंवा स्थानिक वाहनचालकांस विचारत जावे लागते. अनेकदा पंपावर पोहोचल्यावर रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. या साऱ्या अडचणी राहत्या शहरापासून दुसऱ्या शहरात गेल्यानंतर विशेषत: जाणवतात. हीच समस्या हेरून अँड्रॉइडवर ‘सीएनजी स्टेशन इन महाराष्ट्र’(CNG Station in Maharashtra) नावाचे एक अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपद्वारे महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर नजीकच्या सीएनजी पंपची माहिती नकाशातून मिळते. तेथे जाण्याचा मार्गही पाहता येतो. एकूणच सीएनजी आधारित वाहनांच्या चालकांसाठी हे अॅप अतिशय उपयुक्त आहे.

हवामानाचा अंदाज
पावसाळ्याचे दिवस आहेत. गेल्या वर्षी अवघ्या महाराष्ट्राला दगा देणाऱ्या वरुणराजाने यंदा उशिरा का होईना, दमदार सुरुवात केली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाडा या भागांना तर गेल्या आठवडय़ात पावसाने झोडपून काढले. राज्यात अन्यत्रही पावसाची हजेरी सुरू आहे. मात्र, मोसमी पावसाचा नेम नाही. तो कधी मुसळधार कोसळतो तर कधी गायबच होतो. त्यामुळे पावसाचा नेमका अंदाज घ्यायचा असेल तर ‘मोसम’ हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर हवेच. प्रत्येक स्मार्टफोनवर हवामानाचा अंदाज, तापमान सांगणारे ‘डिफॉल्ट विजेट’ असते. परंतु, ‘मोसम’ (Mausam – Indian W
eather) हे अ‍ॅप त्याहीपुढे जाऊन वापरकर्त्यांला माहिती देते. या अ‍ॅपमध्ये संपूर्ण भारताच्या ताज्या हवामानाची स्थिती, आगामी काळातील हवामानाचा अंदाज ही माहिती चित्र आणि शब्दरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या ‘http://www.imd.gov.in/’ या संकेतस्थळावरून प्रदर्शित केले जाणारे हवामान नकाशे आणि अंदाज या अ‍ॅपमध्ये संकलित करण्यात आले आहे. उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवर आधारित नकाशांवरील हवामानाची स्थिती दर अध्र्या तासाने बदलत असते. तसेच दर अध्र्या तासाने पावसाची आकडेवारी बदलत असते. त्यामुळे आपल्या शहरातील पावसाची स्थिती किंवा हवामानाचा अंदाज घेणे सहज शक्य आहे. हवामानाचा अभ्यास करणाऱ्यांसोबतच शेतकरी किंवा सर्वसामान्यांसाठीदेखील हे अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com