News Flash

रांगोळीच्या ‘स्मार्ट’ आयडिया

रांगोळी हे एक प्रकारे उत्सवचिन्हच आहे.

गणेशोत्सव संपताच वेध लागतात ते दसरा-दिवाळीचे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून दिवाळीच्या शेवटच्या दिवसांपर्यंतचा काळ हा या सणांच्या धामधुमीतच जात असतो. कपडे आणि नवनवीन वस्तूंची खरेदी, घराची साफसफाई-सजावट, फराळ आणि मिठाया बनवण्याची लगबग प्रत्येक घरात पाहायला मिळते. यासोबतच या सणांचा आणखी एक आनंद असतो तो रांगोळी रेखाटनाचा. दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या दारात सकाळ-संध्याकाळी विविध रंगांनी आणि नक्षींनी साकारलेल्या रांगोळ्या पाहायला मिळतात. कुणी ठिपक्यांच्या रांगोळीतून नक्षीकाम करत असतं तर कुणी सजीव चित्रे रेखाटताना दिसतं. रांगोळी हे एक प्रकारे उत्सवचिन्हच आहे. त्यामुळे आपली रांगोळी आकर्षक दिसावी, याचा प्रयत्न केला जातो. यासाठी बाजारात अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक जणी रोज ‘गुगल सर्च’ करूनही रांगोळीच्या डिझाइन शोधत असतात; पण यंदाच्या दिवाळीत रांगोळीची पुस्तके किंवा गुगल सर्च करायची गरज नाही. ‘आदर्श मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’चे ‘रंगोली’ (Rangoli) हे अ‍ॅप डाऊनलोड केले तरी तुम्हाला शेकडो रांगोळ्यांच्या ‘आयडिया’ मिळतील. या अ‍ॅपमध्ये दिवाळी रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, गणेश रांगोळी, बंगाली रांगोळी, हृदयकमलम्, संक्रांती, रथम्, सरस्वती, तुलसी, नवग्रह अशा वर्गातील अनेक रांगोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक रांगोळी कशी काढायची, हे चार टप्प्यांत दाखवण्यातही आले आहे. त्यामुळे एखादी अवघड वा क्लिष्ट वाटणारी रांगोळी सहजपणे काढता येते. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप इंटरनेटविना चालवता येत असल्याने यासाठी डेटा खर्च होत नाही.

सर्व फाइल्स एकाच तिजोरीत

स्मार्टफोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्यालयीन किंवा शैक्षणिक कामासाठी उपयुक्त असलेल्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट यासारख्या फाइल्स स्मार्टफोनवरून संगणकासारख्या हाताळता येतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिसची स्मार्टफोनवर अ‍ॅप्स आली असून त्याद्वारे अगदी प्रवास करता करताही ऑफिसचे काम करता येते. हे सर्व काम नंतर आपल्या संगणकावरील कामाशी जुळवून अर्थात ‘सिंक’ही करून घेता येते. या सुविधेमुळे आपल्या स्मार्टफोनवर अनेक प्रकारचे डाक्युमेंट्स (वर्ड, पीडीएफ, एक्सेल, पॉवरपॉइंट) जमा होत असतात. हे सर्व डॉक्युमेंट शोधायचे काम मात्र एक कसरत असते. प्रत्येक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी त्या त्या अ‍ॅपचा वापर करावा लागतो. शिवाय हे सर्व डॉक्युमेंट्स एका जागी दिसत नसल्याने एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स उघडावे लागतात. यावर ‘डॉक्युमेंट मॅनेजर’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘डॉक्युमेंट मॅनेजर’ या अ‍ॅपवरून तुम्ही एकाच वेळी पीडीएफ, टेक्स्ट, एक्सेल अशा सर्व प्रकारच्या फाइल्स  हाताळू शकता. हे सर्व डॉक्युमेंट या अ‍ॅपमधून एकाच वेळी पाहता येतात आणि वर्गवारीनुसार वेगळेही करता येतात. याशिवाय हे डॉक्युमेंट्स हाताळताही येतात.

असिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:17 am

Web Title: rangoli ideas
Next Stories
1 बारकोड स्कॅनर
2 गणितातल्या गमतीजमती
3 व्हिडीओ संवाद
Just Now!
X