News Flash

‘फॉर्म १५ एच’ भरण्यापूर्वी..

अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर होणारा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत.

‘फॉर्म १५ एच’ भरण्यापूर्वी..

*  प्रश्न: शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून एक वर्षांच्या आत विकल्यास झालेल्या नफ्यावर कर भरावा लागतो, तर हा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

– अशोक वर्देकर, ईमेलद्वारे

उत्तर : अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर होणारा कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत. या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून, या वर्षी इतर व्यवहारांतून झालेला अल्प मुदतीचा तोटा वजा करता येतो. किंवा या नफ्यातून मागील आठ वर्षांत झालेला अल्प मुदतीचा भांडवली तोटासुद्धा वजा करता येतो.

*  प्रश्न: मी माझ्या नावाने असलेली शेत जमीन विकत असेन तर मला कर भरावा लागेल का?

– सूर्यभान वैद्य, ईमेलद्वारे

उत्तर : शेतजमिनीच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागेल का? याचे नेमके उत्तर मिळण्यासाठी ही शेतजमीन कोणत्या क्षेत्रात आहे ते तपासून पाहावे लागेल. जर शेतजमीन शहरी भागात असेल तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. आणि जर शेतजमीन शहरी भागात नसेल आणि ग्रामीण भागात असेल तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करमुक्त आहे. यासाठी शहरी भाग म्हणजे असा भाग जो नगरपालिका किंवा महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात आहे आणि तेथील लोकसंख्या १०,००० पेक्षा जास्त आहे. किंवा असे कोणतेही क्षेत्र ज्याची लोकसंख्या १०,००० ते एक लाखामध्ये आहे या क्षेत्राच्या दोन किलोमीटरच्या परिघात असेल तर, किंवा ज्या क्षेत्राची लोकसंख्या एक लाख ते दहा लाखांमध्ये आहे जमिनीच्या क्षेत्राच्या सहा किलोमीटरच्या परिघात असेल तर, किंवा लोकसंख्या दहा लाखांच्या वर आहे अशा क्षेत्राच्या आठ किलोमीटरच्या परिघात जमीन येत असेल तर. आपल्या नावाने असलेली जमीन शहरी भागात असेल तर त्यावर झालेला भांडवली नफा हा करपात्र असेल. हा कर वाचविण्यासाठी ‘कलम ५४बी’नुसार दुसऱ्या शेतजमिनीत गुंतवणूक केल्यास झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविता येतो.

 

*  प्रश्न: मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मी २००५ मध्ये एक निवासी भूखंड १,०५,००० रुपयांना विकत घेतला होता. आता मी तो मे २०१६ मध्ये ५,१०,००० रुपयांना विकला. मिळालेल्या नफ्यावर किती कर भरावा लागेल? अथवा कर वाचविण्यासाठी काय करता येईल? तसेच सदर व्यवहार विवरणपत्रात दाखवावा लागेल का?

– चंद्रशेखर राणे, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्याला झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे महागाई निर्देशांकांचा (इंडेक्सेशन) लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालीलप्रमाणे :

भूखंडाची विक्री किंमत:  ५,१०,००० रुपये

भूखंडाची खरेदी किंमत: १,०५,००० रुपये

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :

२००५-०६ सालचा महागाई निर्देशांक ४९७

२०१६-१७ सालचा महागाई निर्देशांक ११२५

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य:

१,०५,००० ७ ११२५ रु ४९७

= २,३७,६७६ रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा

= २,७२,३२४ रुपये

या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २०.६ टक्के (शैक्षणिक कर धरून) इतका कर भरावा लागेल. परंतु आपल्याला मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य किती आहे हे सुद्धा विचारात घ्यावे लागेल. कारण भांडवली नफा हा विक्री करारानुसार किंमत किंवा मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य या दोहोंपैकी जी जास्त आहे ती विचारात घेऊन भांडवली नफा किती ते काढावे लागेल. वरील विक्री किंमत ही मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्यापेक्षा जास्त आहे असे गृहीत धरले आहे. आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, हा कर वाचविण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक ‘कलम ५४ ईसी’नुसार भांडवली नफ्याएवढी रक्कम (२,७२,३२४ रुपये) रोख्यांमध्ये सहा महिन्यांच्या आत गुंतवणूक करणे आणि दोन ‘कलम ५४ एफ’नुसार एकूण विक्री किंमत (५,१०,००० रुपये) नवीन घरात गुंतवणूक करणे. या दोन्ही कलमांतर्गत असणाऱ्या अटींची पूर्तता मात्र करावी लागेल. आपण ज्येष्ठ नागरिक आहात आपले उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र दाखल करावे लागेल आणि हा व्यवहार आपल्याला विवरणपत्रात दाखवावा लागेल, आपण यावर कर भरला असला तरी किंवा गुंतवणूक करून कर वाचविला असला तरी.

 

*  प्रश्न: मी एक निवासी भूखंड २००२ मध्ये विकत घेतला होता. तो विकून मी सदनिका घेण्याचा विचार करीत आहे. माझ्याकडे तीन घरे आहेत. मला भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का?

– सतीश जोशी, ईमेलद्वारे

उत्तर :  वरील श्री. चंद्रशेखर राणे यांच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय सांगितले आहेत. या दोन पर्यायांपैकी एक पर्याय, ‘कलम ५४ एफ’नुसार नवीन घराच्या गुंतवणुकीचा, हा पर्याय आपल्याला उपलब्ध नाही. कारण या कलमानुसार मिळणाऱ्या सवलतीसाठी एक अट अशीही आहे की, आपल्याकडे नवीन घराव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त घरे नसली पाहिजेत. आपल्याकडे तीन घरे असल्यामुळे या अटीची पूर्तता होत नाही. या कलमानुसार वजावट घेता येणार नाही. आपल्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे ‘कलम ५४ ईसी’नुसार ५० लाख रुपयांपर्यंत रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येईल अन्यथा कर भरावा लागेल.

* प्रश्न: मी ऑक्टोबर २०१५ मध्ये २,४०,००० रुपये एका इक्विटी फंडात पैसे गुंतविले होते. काही वैयक्तिक कारणासाठी ते मी जून २०१६ मध्ये २,००,००० रुपयांना विकले आणि मला ४०,००० रुपयांचा तोटा झाला. हा तोटा मला इतर उत्पन्नातून वजा करता येईल का?

– अजय राणे, कांदिवली

उत्तर : आपल्याला झालेला हा भांडवली तोटा हा अल्प मुदतीचा आहे. हा भांडवली तोटा या वर्षीच्या कोणत्याही भांडवली नफ्यातून (अल्प अथवा दीर्घ मुदतीच्या नफ्यातून) वजा होऊ  शकतो. हा अल्प मुदतीचा भांडवली तोटा, भांडवली नफ्याव्यतिरिक्त इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही. या वर्षीच्या भांडवली नफ्यातून तो पूर्णपणे वजा होत नसेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षीच्या कोणत्याही भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

*  प्रश्न: माझ्या मित्राला ठाण्यातील घर विकून एक व्यावसायिक जागा विकत घ्यावयाची आहे. या व्यावसायिक जागेतील गुंतवणूक घर विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यास पात्र आहे का? – अशोक, ठाणे

उत्तर : एका घराच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल तर ‘कलम ५४’नुसार भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरात केली तर कर भरावा लागत नाही. ही वजावट फक्त घरामध्ये गुंतवणूक केल्यासच मिळते. दुकानात केलेली गुंतवणूक ही या कलमासाठी ग्राह्य़  धरली जात नाही.

*  प्रश्न: मी माझ्या आईला दरमहा काही रक्कम घरखर्चासाठी म्हणून देतो. या पैशातून तिने काही पैसे वाचवून बँकेत तिच्या नावाने मुदत ठेवीत पैसे गुंतविले आहेत. हे उत्पन्न कोणाला करपात्र आहे? या उत्पन्नावर मला कर भरावा लागेल का?

– किरण जोशी

उत्तर : आईला घरखर्चासाठी दिलेली रक्कम  ही आईला करपात्र नाही. परंतु या पैशातून तिने केलेल्या मुदत ठेवींवरील व्याज हे आईच्या उत्पन्नात गणले जाईल. हे उत्पन्न आपल्या उत्पन्नात गणले जाणार नाही.

*  प्रश्न: मी एक सरकारी कर्मचारी आहे. ‘कलम ८० सी’नुसार बँकेतील मुदत ठेवींमधील गुंतवणूक पत्नीच्या नावाने केल्यास मला वजावट मिळेल का?

      – माधव कुटे, नाशिक

उत्तर :  ‘कलम ८० सी’नुसार पाच वर्षांच्या बँकेतील मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक ही करदात्याच्या नावानेच असली पाहिजे. पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्यास आपल्याला वजावट मिळणार नाही. या मुदत ठेवींमध्ये आपले पहिले नाव आणि पत्नीचे दुसरे नाव असल्यास वजावट मिळू शकते.

* प्रश्न: मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मी चार सहकारी बँकेत पैसे गुंतविले आहेत. मी या चारही बँकेचा सभासद असल्यामुळे यापूर्वी मला मिळणाऱ्या व्याजावर बँकेतर्फे उद्गम कर (टीडीएस) कापला गेला नाही. परंतु यावर्षी बँकेने आमच्याकडे ‘फॉर्म १५ एच’ची मागणी केली आहे, जेणेकरून या रकमेवर उद्गम कर कापला जाणार नाही. हा ‘फॉर्म १५ एच’ कोणाला देता येतो?

      – एक वाचक, ठाणे

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल आणि कर देय नसेल तर ते ‘फॉर्म १५ एच’ देऊ  शकतात. आणि एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि कर देय असेल तर ते ‘फॉर्म १५ एच’ देऊ  शकत नाहीत.

(सोबतचा तक्ता पाहावा.)

बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की, ज्या व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापला जात नाही ते व्याज करपात्र नाही. उद्गम कर कापला जाणे आणि करपात्रता या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. जर आपले उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि आपला कर देय असेल तर आपल्याला ‘फॉर्म १५ एच’ देता येत नाही. आणि तरी तो दिल्यास त्याचे काही तोटे आहेत- एक, आपण चुकीची माहिती देता यासाठी प्राप्तिकर कायद्यात कलम २७७ प्रमाणे कडक शिक्षेची तरतूद आहे, दोन, या उत्पन्नावरील कर आपल्याला स्वत:ला बँकेत जाऊन चलनद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे भरावा लागतो. तीन, बँकेने उद्गम कर कापल्यास याची नोंद ‘फॉर्म २६ एएस’मध्ये होते आणि ते उत्पन्न विवरणपत्रात दाखवणे सोपे जाते आणि न विसरता दाखविले जाते. आपला देय कर उद्गम करापेक्षा कमी असला आणि कर परताव्याचा (रिफंड) दावा केला तर हा परतावा विवरणपत्र दाखल केल्यानंतर दोन-तीन महिन्यांत मिळतो. म्हणून करदात्याने ‘फॉर्म १५ एच’ किंवा ‘फॉर्म १५ जी’ देण्यापूर्वी विचार करावा किंवा कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:03 am

Web Title: how to fill form 15 h to save tds on interest income
Next Stories
1 फंड विश्लेषण : सोन्याहून पिवळा..!
2 अर्थ नियोजन : निवृत्ती नियोजन  टाळता येण्यासारख्या काही चुका!
3 गाजराची पुंगी ; ‘ऊर्जित’ पतधोरणासाठी प्रतीक्षा करावी लागेल!
Just Now!
X