अर्थव्यवस्था व गुंतवणूकदारांवर परिणाम करणाऱ्या बाजारातील वदंतांची शहानिशा करण्याचा भाग म्हणून भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रतीक्षित गुंतवणुकीबाबत स्पाइस जेटच्या मुख्य भागीदारांची विचारणा केली. तर जेट एअरवेजमधील हिस्सा कमी करण्याबाबत मुख्य प्रवर्तक नरेश गोयल यांचे म्हणणे जाणून घेतले.
आर्थिक तोटय़ातील स्पाइस जेटचे सहसंस्थापक अजय सिंह व अमेरिकास्थित जेपी मॉर्गनबरोबर सेबीने चर्चा केली. स्पाइस जेटमध्ये जेपी मॉर्गनकडून गुंतवणूक होण्याची प्रक्रिया मुख्य प्रवर्तकांनी सुरू केली आहे. देणी देणे बिकट होत असलेल्या स्पाइस जेटला मध्यंतरी विमानतळ कंपनी व तेल कंपन्यांकडूनही असहकाराला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दक्षिणेतील सन समूहाचे पाठबळ असलेल्या या कंपनीने विदेशी गुंतवणूकदाराचा शोध सुरू केला. त्याला अखेर जेपी मॉर्गनने प्रतिसाद दिल्याने, र्निबध शिथिल करण्याची कंपनीची मागणी सरकार स्तरावरून मान्य करण्यात आली. अमेरिकी गुंतवणूकदार कंपनी नेमकी किती रक्कम व हिस्सा स्पाइस जेटमध्ये राखणार याबाबतची विचारणा सेबीने केल्याचे समजते.
जेट एअरवेजमधील निम्म्याहून अधिक हिस्सा कमी केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्य प्रवर्तक नरेश गोयल यांना द्यावे लागले आहे. याबाबत कंपनीला कर्ज देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने गोयल यांच्याकडे विचारणा केली. कंपनीतील हिस्सा विक्रीबाबत, तसेच कंपनीचे समभाग तारण ठेवण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र कंपनीत ५१ टक्के हिस्सा कायम ठेवला जाईल व स्वत:कडील कोणतेही समभाग तारण ठेवले जाणार नाहीत, असे गोयल यांनी बँकेकडे स्पष्ट केले. कंपनीत गोयल यांचे ५.७९ कोटींहून अधिक समभाग आहेत. कंपनीत संयुक्त अरब अमिरातस्थित इतिहादचा २४ टक्के हिस्सा आहे. स्पाइस जेट व जेट एअरवेज या दोन्ही कंपन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत.