जागतिक स्तरावर मंदी असल्याचे नोव्हेंबरमधील निर्यातीने पुन्हा एकदा सिद्ध केले. चालू आर्थिक वर्षांत सलग सातव्या महिन्यात भारताची निर्यात घसरतीच राहिली आहे. परिणामी निर्यात क्षेत्राला प्रोत्साहनपर पावले सरकारकडून उचलली जातील, अशी शक्यता वाढली आहे.
नोव्हेंबर २०१२ मधील निर्यात ४.१७ टक्क्यांनी घसरून २२.३ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी ही निर्यात २३.२ अब्ज डॉलर होती. २०१२-१३ मध्ये मेपासून सतत निर्यात घसरत आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील निर्यातही ५.९५ टक्क्यांनी खाली आली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत निर्यात वेग घेईल, अशी आशा केंद्रीय वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी यापूर्वीच केलेल्या घोषणेनुसार या क्षेत्रासाठी नवे सहाय्य आठवडय़ाभरात घोषित होण्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.