जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये यावर्षी मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे. क्रिस्टलीना यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर दहावर्षातील निचांकी पातळीला पोहोचण्याची भिती व्यक्त केली आहे. ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागेल असे भाकीत क्रिस्टलीना यांनी वर्तवले आहे.

“दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीपथावर होती. जीडीपीचा विचार केल्यास ७५ टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरु होता. ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा आमचा अंदाज आहे” असे क्रिस्टलीना म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचे हे पहिले भाषण होते.

अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अमेरिका, जापान आणि युरोपमधल्या विकसित देशांमध्ये आर्थिक घडामोडींचा वेग मंदावला आहे. भारत, ब्राझील सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील असे क्रिस्टलीना यांनी सांगितले. क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी या महिन्यात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार संभाळला. क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी आपल्या भाषणात जे म्हटले आहे त्याचे परिणाम भारतात दिसत आहेत. वाहन उद्योगासह अन्य क्षेत्रांना मंदीचा सामना करावा लागतोय. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. पण त्याचा अपेक्षित परिणाम अजून दिसलेला नाही.