युरोपात ब्रिटनसह अनेक देशांमध्ये करोना विषाणूबाधेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या ताज्या प्रकरणातून पुन्हा एकदा टाळेबंदी लागू केली जाण्याच्या भयाने सोमवारी जगभरातील भांडवली बाजाराचा थरकाप उडवून दिला. त्याचेच पडसाद स्थानिक बाजारातही उमटून, सेन्सेक्स ८१२ अंशांनी आपटला तर निफ्टीलाही दोन टक्क्यांच्या घसरणीचा दणका बसून, हा निर्देशांक ११,३०० खाली गडगडला.

युरोपातील डेन्मार्क, ग्रीस आणि स्पेन या देशांनी वाढत्या संसर्गाला प्रतिबंध म्हणून नव्याने निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटनही राष्ट्रव्यापी टाळेबंदीच्या दुसऱ्या फेरीचा गंभीरपणे विचार करीत आहे. याचा परिणाम म्हणून युरोपीय बाजारातून गुंतवणूकदारांनी प्रवास, पर्यटन, उपभोग्य उत्पादने आणि बँकिंग समभागांमध्ये जोरदार विक्री केली. सोमवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार, दिवसाच्या मध्यान्हानंतर खुल्या झालेल्या युरोपीय भांडवली बाजार हे सत्राच्या प्रारंभीच तीन टक्क्यांच्या आसपास गडगडताना दिसून आले.

स्थानिक भांडवली बाजारात सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांक घसरणीत राहिले. सोमवारच्या व्यवहारात, जागतिक बाजाराच्या प्रतिकूल संकेतांना नफावसुलीचीही साथ मिळाल्याने सेन्सेक्सने सत्रअखेरीस ८११.६८ अंशांच्या (२.०९ टक्के) नुकसानीसह ३८,०३४.१४ पातळीवर स्थिरावला. निफ्टी निर्देशांक २५४.४० अंशांच्या (२.२१ टक्के) घसरणीसह ११,२५०.५५ वर दिवसअखेरीस बंद झाला.

सेन्सेक्समध्ये सामील ३० समभागांपैकी इंडसइंड बँक सर्वाधिक ८.६७ टक्क्यांनी घरंगळला. खालोखाल भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्र, मारुती, अ‍ॅक्सिस बँक व बजाज फायनान्स यांना मोठय़ा मूल्यऱ्हासाला सामोरे जावे लागले. निर्देशांकात सामील कोटक बँक, इन्फोसिस व टीसीएस या तीन समभागांमध्ये किंचित वाढ दिसून आली.

४.२३ लाख कोटींची गुंतवणूक मत्ता लयाला

सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांना नफावसुलीने दोन टक्क्यांहून अधिक आपटीला सामोरे जावे लागले. उल्लेखनीय म्हणजे गेले काही दिवस उमदी वाढ दाखविणाऱ्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांना विक्रीपायी मोठय़ा मूल्यऱ्हासाचा सामना करावा लागला. हे निर्देशांक ३.६० टक्के ते ४ टक्क्यांनी गडगडले. दूरसंचार, स्थावर मालमत्ता, धातू, वाहन, आरोग्यनिगा हे उद्योग क्षेत्र निर्देशांक पावणे सहा ते सहा टक्क्यांनी आपटले. या सर्वव्यापी बाजार घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ४.२३ लाख कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.