भांडवली बाजारातील तेजी सप्ताहअखेर पुन्हा दिसून आली. आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात दरम्यान नवा विक्रमी स्तर अनुभवल्यानंतर प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत तेजीसह बंद झाले. मात्र सत्रअखेरची विक्रमी झेप त्यांना नोंदविता आली नाही.

शुक्रवारच्या सत्रात ४३,३०९.६३ या सर्वोच्च स्थानी विराजमान झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व्यवहार अखेर १३९.१३ अंश वाढीसह ४६,०९९.०१ वर बंद झाला.

४६ हजारांच्या काठावर स्थिरावणारा मुंबई निर्देशांक विक्रमी टप्प्यापासून काही अंतरावरच आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी शुक्रवारअखेर ३५.५५ अंश वाढीमुळे १३,५१३.८५ वर पोहोचला.

सत्रात १३,५७९.३५ अंशपर्यंत विक्रमी नोंद करणारा निफ्टी सत्रअखेर १३,५०० पुढे कायम राहिला; मात्र त्याच्या ऐतिहासिक शिखरापासून काहीसा दूर आहे.

शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ओएनजीसी तेजीसह अग्रणी राहिला. त्याचे मूल्य थेट ५.६८ टक्क्यांनी झेपावले. अमेरिकी पतमानांकन संस्था मॉर्गन स्टॅनलेने तिचे गुंतवणूक पतमानांकन उंचावल्याचा तो परिणाम होता.

मुंबई निर्देशांकांच्या प्रमुख ३० समभागांमध्ये एनटीपीसी, टाटा स्टील, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टायटन, बजाज ऑटो, स्टेट बँकही वाढले. तर अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, टेक मिहद्र बँक एचसीएल टेक, बजाज फिनसव्‍‌र्ह, इन्फोसिस आदी २.१९ टक्क्यांसह घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बहुपयोगी वस्तू, तेल व वायू, ऊर्जा, पोलाद, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू आदी २ टक्क्यांहून अधिक वाढले. तर आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, वाहन, दूरसंचार निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.

सलग तेजी व विक्रमी स्तर नोंदविणाऱ्या चालू सप्ताहात सेन्सेक्स १,०१९.४६ अंशांनी तर निफ्टी २५५.३० अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत दोन्ही निर्देशांकांचे सप्ताहतुलनेतील वाढते प्रमाण २ टक्के आहे.