चंद्री पेपर्सविरोधात ९ कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा

अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या शाखेत घोटाळा केला त्याच ब्रॅडी हाऊस शाखेत नऊ कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. चंद्री पेपर्स अ‍ॅण्ड अलाइड प्रॉडक्ट्सला ९.०९ कोटी रुपयांची हमीपत्रे देण्यात आल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नव्याने गुन्हा नोंदविला आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा माजी कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात यांची मोदी-चोक्सीप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआयने नोंदविलेल्या नव्या एफआयआरमध्ये शेट्टी आणि खरात यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोदी-चोक्सी प्रकरणात पीएनबीचे कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. नव्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने ९ मार्च रोजी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्यानंतर चंद्री पेपर्सच्या संचालकांची नावे या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.  संबंधित कंपनी आणि संचालकांच्या मालमत्तांची झाडाझडतीची मोहिमही हात घेण्यात आली आहे.

पीएनबीच्या मुंबईतील शाखेने चंद्री पेपर्सकरिता स्टेट बँकेच्या बेल्जियममधील शाखेला बनावट हमीपत्रे दिली होती. यासाठीचे कर्ज कंपनीला जानेवारी २०२० पर्यंत परतफेड करावयाचे आहे.

‘बनावट हमीपत्रे केवळ पीएनबीचीच’

नीरव मोदी प्रकरणात चर्चेला आलेले बनावट हमीपत्र केवळ पंजाब नॅशनल बँकेमार्फतच दिले गेल्याचे स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. अन्य बँकाही अशाप्रकारची हमीपत्रे संबंधित कर्जदारांसाठी विदेशातील अन्य बँकांना देत असतात; मात्र अशी बनावट हमीपत्रे असल्याचे केवळ पीएनबीबाबतच स्पष्ट झाल्याचे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. बनावट हमीपत्राच्या आधारे पीएनबीला १३,००० कोटी रुपयांनी फसविल्याच्या प्रकरणात तपास यंत्रणांची कारवाई तीव्र होत असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य व्यापारी बँकांना तातडीने अशी हमीपत्रे देण्यावर बंदी घातली. यापूर्वी दिल्या गेलेल्या हमीपत्रांचा नव्याने आढावा घेण्याच्या सूचनाही बँकांना करण्यात आल्या आहेत. एकटय़ा नीरव मोदीच्या कंपन्यांना पीएनबीने मार्च २०११ पासून १२१३ बनावट हमीपत्रे दिली आहेत.