News Flash

पेटय़ा रॅन्समवेअरची सुधारित आवृत्ती जास्त घातक

‘जेएनपीटी’च्या यंत्रणेवर सायबर हल्ला

| June 29, 2017 02:36 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जेएनपीटीच्या यंत्रणेवर सायबर हल्ला

मे महिन्यात पसरलेल्या वन्नाक्राय या रॅन्समवेअरप्रमाणे आता पेटय़ा मालवेअरने जगातील विविध देशांत संगणकांवर हल्ला केला असून त्यात अनेक तंत्रांचा वापर केल्याने हे मालवेअर एका संगणकात शिरल्यानंतर वेगाने इतर संगणकात पसरत आहे. वन्नाक्रायनंतर काही आठवडय़ातच झालेल्या या हल्ल्याने युरोपला फटका बसला असून भारतातही हा मालवेअर येत आहे.

सोफॉस या सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनीने म्हटले आहे, की या मालवेअरची सुधारित आवृत्ती ही वेगाने पसरणारी असून कंपनीच्या एका संगणकात मालवेअर शिरले की इतर संगणकात पसरण्यास वेळ लागत नाही. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये या मालवेअरचा फटका बसला असून अधिकारी त्याला काबूत ठेवण्यासाठी उपाय करीत आहेत. माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारतात अजून त्याचा मोठा फटका बसलेला नाही. जीएसटीएन ही कर सॉफ्टवेअर प्रणाली १ जुलैपासून जीएसटी सुधारणा लागू करण्यात मोठी भूमिका पार पाडणार आहे, त्या प्रणालीला अजून तरी फटका बसला नाही.

दोन हजार संगणकांना बाधा

कास्परस्की या सुरक्षा संस्थेने म्हटले आहे, की किमान दोन हजार संगणकांवरील माहिती मंगळवारी पेटय़ा मालवेअरच्या हल्ल्याने अडकून पडली असून रशिया व युक्रेनला मोठा फटका बसला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड व अमेरिका या देशातही त्याचा परिणाम झाला असून रशियातील रॉशनेफ्ट ही मोठी तेल कंपनी, युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, एपी मोलर मारेस्क ही जहाज कंपनी, डब्ल्यूपीपी ही जाहिरात कंपनी यांना लक्ष्य बनवण्यात आले आहे. सर्व कंपन्यांनी विंडोज सॉफ्टवेअर अपडेट करून सुरक्षेचा विचार करावा.

बिटकॉइन्समध्ये खंडणी वसुली

पेटय़ा मालवेअरही रॅनसमवेअर असून त्यात संगणकातील माहिती बंदिस्त करून खंडणी मागितली जाते. ३०० डॉलर्स इतके बिटकॉइन यात मागितले जात असून ते दिले, तरी फाइल्स मोकळ्या होतात की नाही याची खातरजमा झालेली नाही.

नवी दिल्ली: भारतात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला पेटय़ा मालवेअर हल्ल्याचा फटका बसला असून त्याचा मुकाबला करण्यासाठी जहाज मंत्रालय व पोर्ट ट्रस्टने कंबर कसली आहे. जहाज बांधणी मंत्रालयाने म्हटले आहे, की एपीएम मस्र्क या खासगी टर्मिनल ऑपरेटरने हा हल्ला पेटय़ा मालवेअरचा असल्याचे सांगितले असून हाच व्हायरस जगभर सायबर हल्ल्यास कारण ठरला आहे.

मालवाहू जहाजांच्या नियंत्रणावर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता  पाहून एपीएम माएरस्क या खासगी ऑपरेटरने काही उपाययोजना सांगितल्या आहेत. जहाज मंत्रालय व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांनी या हल्ल्याबाबत जागरूकता दाखवून व्यापार, वाहतूक यात अडथळे येऊ नयेत तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. जहाजांचे वाहतूक व्यवस्थापन या मालवेअरमुळे कठीण होऊ शकते हे पाहून खासगी टर्मिनलसाठी पार्किंग खुले करण्यात आले आहेत. सीएफएस कंटनेर स्थानकांना मालवाहू जहाजे त्यांच्याच जागेत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जहाज वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माएरस्क समूहाने सांगितले, की त्यांच्या वाहतुकीला सायबर हल्ल्याचा फटका बसला असून मंगळवारी म्हणजे २७ जूनला एपी मोलर माएरस्कला सायबर हल्ल्याचा फटका बसला. आता ग्राहक व भागीदार यांच्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने सिडकोच्या स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊन जास्त पार्किंग उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक गुलशन राय हे जवाहलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला भेट देत आहेत.

जीएसटी सॉफ्टवेअर तूर्त सुरक्षित

फोर्सपॉइंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट मायनाहन यांच्या मते, आताचे हल्ले हे महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना घातक आहेत. सरकार ते बोर्डरूमपर्यंत सर्वानीच या सायबर हल्ल्याची दखल घेण्याची गरज आहे. तथापि नव्या वस्तू व सेवा करप्रणाली अर्थात जीएसटीची माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा बाधारहित आणि जीएसटीसाठी नोंदणीही व्यवस्थित सुरू आहे, असा सरकारने दावा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:36 am

Web Title: ransomware cyber attack on jnpt
Next Stories
1 नैसर्गिक वायूचा वस्तू व सेवा करात समावेश?
2 वादग्रस्त ‘एच १ बी व्हिसा’ मुद्दा मोदी-ट्रम्प चर्चेबाहेरच!
3 सेन्सेक्स ३१ हजारांखाली!
Just Now!
X