सलग पाचवी रेपोदर कपात; प्रमुख दर आता दशकाच्या तळात

मुंबई : तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसऱ्याची अनोखी भेट रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी गृह, वाहन खरेदीदारांना दिली. रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी बँकांच्या कर्जासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रेपो दर थेट पाव टक्क्याने कमी करत तो ५.१५ टक्के असा दशकाच्या किमान स्तरावर आणून ठेवला आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सलग पाचव्यांदा  व्याजाचे दर कमी करतानाच रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चालू वित्त वर्षांचा अर्थव्यवस्था वाढीचा दराचा अंदाज पुन्हा सुधारून तो ६.१ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. वर्षांरंभी या संबंधी रिझव्‍‌र्ह बँकेचा अंदाज ६.९ टक्के असा होता. याचा परिणाम सप्ताहअखेर भांडवली बाजारातही निर्देशांक घसरणीच्या रूपात दिसून आला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समिती- ‘एमपीसी’ची गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली बैठक शुक्रवारी संपली. समितीचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांच्यासह समितीच्या सर्व, सहाही सदस्यांनी पाव टक्के रेपो दर कपातीच्या बाजूने एकमताने कौल दिला.

चालू आर्थिक वर्षांचे चौथे द्विमासिक पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर ५.१५ टक्के असा मार्च २०१० नंतरच्या किमान स्तरावर आणून ठेवला आहे. ताज्या दर कपातीमुळे प्रमुख दर २०१९ सालात आतापर्यंत १.३५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

महागाई दर गेल्या अनेक महिन्यांपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षित ४ टक्क्यांच्या पातळीच्या आत असला तरी ५ टक्के अशा सहा वर्षांच्या तळात घसरलेल्या विकास दराच्या प्रोत्साहनार्थ व्याजदर कपात केली जाईल, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती.

रिझव्‍‌र्ह बँक वेळोवेळी व्याजदर कपात करूनही प्रत्यक्षात व्यापारी बँका तेवढा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचवत नसल्याची तक्रार खुद्द गव्हर्नरांनी व्यक्त केली आहे. नव्या दर कपातीचा लाभ मात्र बँका देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेपो दराशी संलग्न कर्ज व्याजदर १ ऑक्टोबरपासून अनिवार्य करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच व्यापारी बँकांना दिल्या आहेत. त्यातच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार बँकांनी गुरुवारपासूनच कर्ज मेळावे आयोजित करणे सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत ऐन दसरा-दिवाळीच्या सण-समारंभात ग्राहकांकडून खरेदीसह कर्ज मागणीत वाढ होण्याची आशा पल्लवित झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे गृहनिर्माण, वाहन, बँक क्षेत्रातून स्वागत केले आहे.

ग्रामीण आणि सूक्ष्म वित्तपुरवठय़ाला बळकटी

मुंबई : सूक्ष्म वित्त संस्था तसेच बँकेतर वित्तीय कंपन्यांना असलेली कर्जपुरवठय़ाची मर्यादा रिझव्‍‌र्ह बँकेने वाढविल्याने विशेषत: ग्रामीण भागातून पतपुरवठा मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यत: महिला बचत गट आणि त्यांच्या सदस्यांना याचा फायदा होणार आहे. सूक्ष्म वित्त कंपन्यांना असलेली कर्जपुरवठा मर्यादा सध्याच्या एक लाख रुपयावरून १.२५ लाख रुपये वाढविण्यात आली आहे. तर बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठीची ग्रामीण भागासाठीची पतपुरवठय़ाची मुभा विद्यमान एक लाख रुपयांवरून १.२५ लाख रुपये करण्यात आली आहे. तर शहरी, निमशहरी भागासाठी ती १.६० लाख रुपयांवरून २ लाख रुपये करण्यात आली आहे.

* पाव टक्का कपातीने रेपो दर ५.१५ टक्क्य़ांवर

* दर कपात निर्णयावर ‘एमपीसी’मध्ये सर्वसहमती

* आर्थिक विकास दर अंदाज घटवून ६.१ टक्क्य़ांवर

* महागाई दर किमानतम राहण्याचा आशावाद

* सरकारी अर्थवृद्धीपूरक उपायांच्या परिणामांबाबत आशा

* आगामी पतधोरण डिसेंबरमध्ये पहिल्या आठवडय़ात

सध्याच्या विकास खुंटल्याच्या स्थितीवर उतारा म्हणून आणि अर्थव्यवस्थेला गती देऊ शकणारे प्रोत्साहन म्हणून सलग पाचवी कपात आणि दशकाच्या तळातील रेपो दर हे आवश्यक पाऊलच आहे.

* शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक

..म्हणूनच पीएमसी   बँकेवर कारवाई’

मुंबई : वित्तीय अनियमितता आढळल्यानेच पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. एचडीआयएल समूहाला दिलेले संपूर्ण थकीत कर्ज या बँकेने तिच्या ताळेबंदात ‘अनुत्पादित (एनपीए)’ म्हणून नमूद केले नाही, असेही ते म्हणाले.

तथापि देशातील सहकारी आणि  एकूणच बँकिंग व्यवस्था भक्कम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. एका सहकारी बँकेच्या अडचणीमुळे संपूर्ण क्षेत्र संकटात आहे, असे मानण्याचे मुळीच कारण नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला. सामान्यजणांनी घाबरून जाण्याचे व चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेखाली असलेल्या लक्ष्मी विलास बँकेतील इंडियाबुल्स हाऊसिंग कंपनीच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वागत नव्हे नाराजी!

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेची अपेक्षित व्याजदर कपात उत्साहदायी ठरण्याऐवजी, गव्हर्नरांनी अर्थव्यवस्थेविषयी व्यक केलेली चिंता भांडवली बाजारावर अधिक परिणामकारक ठरली. परिणामी बाजारात आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रावरही घसरण-छाया राहिली आणि व्याजदराशी संबंधित बँक, वित्तीय, वाहन कंपन्यांना त्याचा फटका बसला.

सप्ताहाची अखेर करताना सेन्सेक्सने ४३३.५६ अंशांच्या आपटीने ३७ हजारांचा स्तर सोडला. तर १३९.२५ अंश घसरणीने निफ्टी ११,२०० च्या खाली आला. शुक्रवारच्या व्यवहाराची सुरुवात ३०० अंशांनी करणारा सेन्सेक्सची दिवसभरात तब्बल ७७० अंशांनी गडगडलेला दिसला.

व्याजदर कपातीबाबत विश्लेषकांमध्ये एकमत असतानाही, चालू आठवडय़ात सेन्सेक्स १,१४९.२६ अंशांनी तर निफ्टी ३३७.६५ अंशांनी घसरला आहे. भांडवली बाजारात व्यवहार सुरू असताना पतधोरण जाहीर करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे बाजारात विपरीत पडसाद उमटले. मात्र रेपो दरातील पाव टक्के कपातीपेक्षा रिझव्‍‌र्ह बँकेने विकास दराचा अंदाज ६.१ टक्क्यांपर्यंत खुंटविण्याची नकारात्मक प्रतिक्रिया निर्देशांकांवर अधिक उमटली.