News Flash

२८० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे नीरव मोदीच्या मालमत्तेवर छापे, मुंबईतल्या घरालाही सील

पंजाब नॅशनल बँकेला २८० कोटी रुपयांचा तोटा

नीरव मोदी यांच्या मुंबईतील दागिन्यांच्या दुकानावर ईडीने छापे घातले. छायाचित्र सौजन्य - गणेश शिर्सेकर

पंजाब नॅशनल बँकेतील २८० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता तपासयंत्रणांनी आपली कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारायला सुरुवात केली आहे. ईडीच्या अंदाजे ६० हून अधिक अधिकाऱ्यांनी नीरव मोदी याच्या मुंबई, सुरत आणि दिल्ली येथील खासगी मालमत्ता आणि दागिन्यांच्या दुकानावर छापे मारल्याचं कळतंय. मुंबईतल्या काळा घोडा , लोअर परळ आणि वांद्रे या भागातील दुकानांवर ईडीने छापेमारी केली आहे. दिल्लीच्या चाणाक्यपुरी आणि डिफेन्स कॉलनी परिसरातील दुकानांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचं समजतंय. याचसोबत सीबीआयने नीरव मोदी याच्या मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या घराला सील ठोकलं आहे.

अवश्य वाचा – कोण आहे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी?

सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी अमि, भाऊ निशाल आणि आणखी एका नातेवाईकावर ३१ जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेची २८० कोटी रुपयांची फसवणुक केल्याबद्दल सीबीआय आपली कारवाई करत आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत सध्या मोदी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २०१७ सालापर्यंत पंजाब नॅशनल बँकेत उप-व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत २८० कोटी रुपये किमतीची ८ Letters of Understanding (LOU) नीरव मोदी याच्या कंपनीच्या नावे जारी केली. आपल्या निवृत्तीला केवळ ३ महिने शिल्लक असताना शेट्टी यांनी हा प्रकार केल्यामुळे, सीबीआय या प्रकरणात शेट्टींची कसून चौकशी करणार आहे.

यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून शेट्टी यांच्यामार्फत करण्यात आलेल्या जुन्या व्यवहारांची चौकशी करताना काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. खोट्या हमीपत्राच्या आधारे (LOU) बँकेच्या Nostro Account मधून व्यवहार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परकीय चलनासाठी एखादी बँक दुसऱ्या बँकेत वेगळं खातं तयार करते, त्याला Nostro Account असं म्हणतात. परकीय चलनाची देवाण-घेवाण आणि इतर व्यापारविषयक कामांसाठी बँक आपल्या Nostro Account चा वापर करत असते.

अवश्य वाचा – नीरव मोदीचे अंबानी कनेक्शन माहितीये का?

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये, बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नीरव मोदी याच्या कंपनीला फायदा होईल अशी कामं केली. यातून पंजाब नॅशनल बँकेला तब्बल २८० कोटी रुपयांचा तोटा झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीबीआय या घोटाळ्यात सहभागी असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार असून, ईडी Violation of Foreign Exchange आणि Anti Money Laundiring Norms चं झालेलं उल्लंघंन तपासणार आहे. सध्या नीरव मोदी हा स्वित्झर्लंडला पळून गेल्याचं वृत्त समोर येतं आहे.

अवश्य वाचा – पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणाऱ्या नीरव मोदीचे दागिने ‘या’ सेलिब्रिटींनीही मिरवले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2018 2:43 pm

Web Title: rs 280 crore pnb cheating case ed raids at multiple locations cbi seals nirav modis mumbai house
टॅग : Cbi,Ed
Next Stories
1 कोण आहे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी?
2 तपासाची सूत्रे सीबीआयकडे
3 डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर हल्ला बोल
Just Now!
X